तालुक्यातील महत्त्वपूर्ण बाजारपेठ असलेल्या व सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असलेल्या घोटी बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम मागील वर्षी लाखो रुपये खर्चून झाल्यानंतर चार महिनेही उलटत नाही तोच स्थानकाच्या आवारात चिखलाचे प्रचंड साम्राज्य झाल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबत मनसेसह श्रमजीवी संघटनेने स्थानकाच्या आवारात भात लागवड आंदोलन केल्यानंतर शासनाने स्थानक आवारात डांबरीकरण केल्याने कायम चिखलात असणारे हे आवार चिखलमुक्त झाले आहे.
घोटी स्थानकाची झालेली बिकट अवस्था लक्षात घेऊन मागील वर्षी दुरुस्ती करण्यात आली होती; परंतु या दुरुस्तीच्या कामात स्थानकाच्या वाहनतळाचे काम केवळ खडीकरणाने केल्याने पावसामुळे या स्थानकाच्या आवारात मोठय़ा प्रमाणात चिखल साचला होता. प्रवाशांना चिखल तुडवीतच स्थानकात यावे लागत होते. तातडीने स्थानकाची दुरुस्ती करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेनेसह श्रमजीवी संघटनेने स्थानकाच्या आवारातील चिखलात भात लागवड आंदोलन केले होते. आ. निर्मला गावित यांनी या आंदोलनाची विशेष दखल घेत स्थानक आवाराच्या डांबरीकरणासाठी शासनाने वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा व आवाराचे डांबरीकरण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर परिवहन महामंडळाने डांबरीकरणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करीत पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण केल्याने आवारातील चिखलाचे साम्राज्य दूर झाले. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना होणारा त्रास या वर्षी दूर झाला.