कराड शहर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी महावीर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये जैन बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये घोडे, रथ सहभागी करण्यात आले होते. मुख्य बाजारपेठेतील जैन मंदिरापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. जैन मंदिरापासून चावडी चौक, कन्याशाळा, कृष्णा नाका, उपजिल्हा रुग्णालय, विजय दिवस चौक बसस्थानक, दत्त चौक मार्गे ही मिरवणूक नेमीनाथ मंदिरापर्यंत नेण्यात आली. या वेळी त्यामध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले.
भारतीय जैन समाज संघटनेच्या वतीने दुपारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुध्ये सुमारे ८० जणांनी रक्तदान केले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष रितेश ओसवाल, उपाध्यक्ष दीपक निंबजिया, सचिव रिषभ लुणिया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात आले.