लांडे खून प्रकरणातील फिर्यादी शंकरराव राऊत यांची बदनामी केल्याच्या आरोपावरुन नगरचे निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत नागवडे व तलाठी भिमराज दातरंगे या दोघांना न्यायालयाने १ महिना कैद व प्रत्येकी २ हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. इंदलकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. श्री. राऊत यांनी नागवडे व दातरंगे या दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र दावे दाखल केले होते, त्यामध्ये ही शिक्षा स्वतंत्रपणे देण्यात आली. राऊत यांच्या वतीने वकिल राजेंद्र शेलोत व वकिल बोरा यांनी तर नागवडेच्या वतीने वकिल तरटे व दातरंगेच्या वतीने वकिल विलास गरड यांनी काम पाहिले. दोघांनी दंडाची रक्कम लगेचच भरली व अपील करण्यास मुदत मागितली, त्यानुसार २७ मेपर्यंत दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
राऊत यांचा मुलगा दत्तात्रेय याचा दि. १ जुलै २००१ रोजी खून केल्याच्या आरोपावरुन काँग्रेसचा निलंबित शहर जिल्हाध्यक्ष भनुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदिप, सचिन व अमोल या चौघांसह नागवडे, दातरंगे व इतर १२ जण आरोपी आहेत. नागवडे व दातरंगे या दोघांना जामीन मंजूर झालेला आहे. खुनाच्या गुन्ह्य़ात कोतवाली पोलिसांनी आरोपींची नार्को चाचणी करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर न्यायालयाने आरोपींना म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला, तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात नागवडे व दातरंगे यांनी राऊत हे ‘मेंटल’ आहेत, त्यांच्यावर डॉ. क्षीरसागर यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले, राऊत यांच्या जाचामुळेच मुलगा दत्तात्रेय याने आत्महत्या केली, असे लेखी दिले होते व ते ५ ऑगस्ट २००७ रोजी काही वृत्तपत्रात (‘लोकसत्ता’ नव्हे) प्रसिद्ध झाले होते.
त्यामुळे राऊत यांनी नागवडे व दातरंगे विरुद्ध स्वतंत्र दावे दाखल केले, न्यायालयाने कोतवाली पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले. उपनिरीक्षक गफ्फार अब्दुल सरदार शेख यांनी चौकशी करुन राऊत यांची नाहक बदनामी झाल्याचा अहवाल सादर केला. खटल्याच्या सुनावणीत डॉ. अनय क्षीरसागर यांनीही राऊत यांना ओळखत नाही, त्यांना रुग्ण म्हणुन तपासले नाही, त्यांच्यावर कधी उपचार केले नाही, असे सांगितले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने नागवडे व दातरंगे या दोघांना शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ दिवसांचा कारावास भोगण्याचाही आदेश आहे.