अलीकडे पावसाचा लहरीपणा वाढला असला तरी आगामी वर्षांत मात्र समाधानकारक पाऊस पडेल असे दिलासा देणारे भाकीत येथील गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरीमध्ये वर्तवण्यातोले आहे.
सतराव्या शतकात थोर संत म्हणुन प्रसिध्द पावलेले, संत मीराबाई यांच्या वंशातील श्री गोदड महाराज यांनी विविध धर्मग्रंथ व साहित्याचे लिखाण केले आहे. विविध विषयांचे गाढे अभ्यासक म्हणूनच त्याकाळी त्यांची दूपर्यंत ख्याती होती. त्यांनी प्रत्येक वर्षांचे पीक, पाऊस, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध गोष्टी वर्षनिहाय लिहून ठेवल्या आहेत. या संवत्सरीचे दरवर्षी हिंदु नववर्षदिनी म्हणजे गुढीपाडव्याला सामुहिक वाचन केले जाते. ते ऐकण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक जमतात. प्रामुख्याने पाऊस व त्याअनुषंगाने पीक-पाण्याबाबत लोकांना या गोष्टीचे महत्व असते.
आगामी वर्षांच्या सवंत्सरीतील भाकीत ऐकण्यासाठी आज गोदड महाराज मंदिरात मोठी गर्दी झाली होती. सलग दोन वर्षांच्या दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर सर्वानाच पावसाच्या भाकिताबद्दल कमालीचे कुतूहल होते. मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी संवत्सरीचे वाचन केले.
या वर्षीच्या संवत्सरीचे नाव विजयनाम आहे, स्वामी बुध आहे. या वर्षांत समाधानकारक पाऊस पडेल असे बाकीत त्यात वर्तवण्यात आले आहे. मे महिन्यात अवकाळी पाऊस पडेल, जुनमध्ये चांगला पाऊस, आद्र्रा नक्षत्रात समाधानकारक, पुढे मात्र थोडी ओढ राहील. नंतर पुष्य नक्षत्रात मध्यम, मघा, पुर्वा व हस्त नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, उर्वरीत नक्षत्रांच्या काळात मध्यम राहील. पेरण्यांनंतरही पावसाचे भाकीत निघाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला.
देश व जागतिक भाकीतही
आगामी वर्ष केंद्रात सत्तांतर घडवणारे असेल. जागतिक स्तरावर युध्दाची शक्यता असून या मधून मोठा रक्तपात होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिमेकडील राज्यांमध्ये बंडाळीची शक्यता राजकीय नेत्यांना आगामी वर्ष त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय पर्यावरणाचा विषय अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.