मुंबईत मॉल संस्कृती उदयाला आल्यापासून याआधी शनिवार-रविवारच्या संध्याकाळी दादर किंवा गिरगाव चौपाटीकडे किंवा ठाण्यात तलावपाळीकडे वळणारी पावले मॉलमध्ये वळायला लागली आहे. कपडय़ांपासून दैनदिन भाजी खरेदीपर्यंत सर्वच गोष्टी मॉलमध्ये मिळत असल्याने आता गृहिणी नवऱ्याला, ‘अहो, मॉलमध्ये जाताय ना. मग थोडी भाजी घेऊन या ना.’ असा आग्रह करायला लागल्या. मात्र या आग्रहात बदल होण्याची शक्यता असून आता ‘मॉलमध्ये जाताय ना, मग जरा रेल्वेचे तिकीट काढा’, अशी मागणीही होण्याची शक्यता आहे. तिकिटांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने आता सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) मॉलमध्ये आरक्षित तिकिटे विकण्याचे ठरवले आहे. यासाठी मध्य रेल्वेने इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. मात्र यात एका आरक्षित तिकिटामागे ३० ते ४० रुपये सेवा शुल्कही द्यावे लागणार आहे.
सणावारांच्या काळातच नाही, तर वर्षांतील बाराही महिने रेल्वे तिकिटांचे आरक्षण मिळणे, ही कर्मकठीण बाब असते. बहुतांश तिकिटे तिकीट दलालच आरक्षित करून तिकिटांचा काळाबाजार करत असल्याचे अनेकदा आढळले आहे. त्यामुळे या तिकीट दलालीला आळा घालण्यासाठी आता रेल्वेने एक वेगळाच उपाय शोधून काढला आहे. ऑनलाइन आरक्षणाबरोबरच तिकीट रांगांमध्ये उभे राहून आरक्षण करणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अशा लोकांना वेगळा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तिकीट खिडक्यांसमोरील रांगा कमी करण्यासाठी आता मॉल्स, सुपरमार्केट्स आणि शॉपिंग संकुले येथे रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण उपलब्ध होणार आहे. ही योजना पीपीपी तत्त्वावर राबवली जाणार आहे. रेल्वे बोर्डाने याबाबत घोषणा केली होती.
या योजनेद्वारे मॉल्समध्ये एक वेगळी खिडकी देण्यात येईल. ही खिडकी सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत सुरू असेल. तर रविवारी सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत उघडी असेल. मॉल्समधून मिळणाऱ्या तिकिटांचा रंग रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर मिळणाऱ्या तिकिटांपेक्षा वेगळा असेल.
या योजनेद्वारे मॉलमध्ये तिकीट खिडकी घेणाऱ्याला वर्षभराचे १.६० लाख रुपये शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. त्याशिवाय तिकिटांच्या रकमेइतकी अनामत रक्कमही जमा करावी लागणार आहे.
या खिडकीवर सामान्य तिकिटे सकाळी नऊपासून आरक्षित होण्यास सुरुवात होईल, तर तात्काळ तिकिटांचे आरक्षण सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे. या खिडक्यांवरून तिकिटे आरक्षित करायची असल्यास सामान्य शयनयान श्रेणीच्या तिकिटासाठी ३० रुपये आणि वातानुकुलित श्रेणीच्या तिकिटासाठी ४० रुपये सेवा शुल्क आकारले जाणार आहे. मध्य रेल्वेने याबाबत इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले असून या प्रस्तावांचा अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.