सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा, परिसंवाद, वक्ते, विषय आणि एकूणच आयोजनाविषयीचा कार्यक्रम नक्की करण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी महामंडळाच्या मार्गदर्शन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.‘आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या सासवड शाखेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड येथे हे संमेलन होणार आहे.
साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शन समितीच्या बैठकीत साहित्य संमेलनाच्या तारखाही निश्चित केल्या जाणार असून संमेलन या वर्षीच्या डिसेंबर अखेरीस की पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आयोजित करायचे याचा निर्णयही होणार आहे. महामंडळाच्या विविध घटक संस्था, समाविष्ट आणि संलग्न संस्थांकडून मतदारांची यादी तयार करण्याच्या कामासह सुरुवात झाली आहे. मतदार याद्या तयार करणे, त्याला अंतिम रूप देणे आणि संमेलनाध्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रमही या बैठकीत नक्की केला जाणार आहे. मार्गदर्शन समितीची बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक होणार असून त्या बैठकीत मार्गदर्शन समितीने ठरविलेल्या कार्यक्रमावर मान्यतेची मोहोर उमटविली जाणार आहे.