महानगरपालिका निवडणुकीतील भाजप-शिवसेना युती व दोन्ही काँग्रेसची आघाडी याबाबत धोरणात्मक निर्णय झाले असले तरी प्रत्यक्ष जागावाटपांवर सगळ्यांचेच घोडे अडले आहे. बुधवारी सर्वांचीच पहिली यादी जाहीर होण्याची अपेक्षा असताना या चारही प्रमुख पक्षांमध्ये अजूनही ताणाताणीच सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेने १७ व मनसेने १५ उमेदवारांची पहिली यादी पक्षश्रेष्ठींकडे मान्यतेसाठी पाठवल्याचे समजते.
मनपा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेस यांचे बुधवारी दिवसभर चर्चेचेच गु-हाळ सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत कोणाचाही प्रभाग वाटपाचा निर्णय झालेला नव्हता. त्यानंतरही हे गु-हाळ सुरू होते. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्वांचीच ही प्रक्रिया गुरुवारीही सुरू राहील असेच दिसते. याबाबात आता नाराजीही व्यक्त केली जात असून प्रामुख्याने सर्वच पक्षांचे इच्छुक खोळांबले आहेत.
भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटप अगदी सहजासहजी ठरले. अनुक्रमे ३१ व ३६ यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले, एक जागा (मुकुंदनगर) प्रलंबित आहे. त्यातही शिवसेनेला फारसा रस नाही. मात्र ही गोष्ट सहज होऊनही पुढचे प्रभाग वाटप रेंगाळले आहे. आज दिवसभर याबाबत चर्चा झाली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सुनील रामदासी व अनंत जोशी तर शिवसेनेच्या वतीने अनिल शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम, सुधीर पागारिया यांच्यात दुपारपासून सायंकाळपर्यंत चर्चा सुरू होती.
या चर्चेत काही जागांवर दोन्ही पक्षांनी दावे केल्याचे समजते. त्यामुळेच चर्चा पुढे सरकली नाही. शिवाय शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक किती हाही कळीचा मुद्दा ठरू पाहतो आहे, असे समजते. गेल्या वेळी त्यांचे १८ नगरसेवक निवडून आले होते, मात्र त्यातील काही नंतर फुटले त्यामुळे ही संख्या गृहीत धरताना नवाच तांत्रिक पेच निर्माण होऊ लागला आहे. मात्र फारशा अडचणी येणार नाहीत, किरकेळ मुद्दे वगळता आता ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येते. मात्र उद्यापर्यंत तरी ती होईल की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेने १७ जणांची पहिली यादी मान्यतेसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याचे समजते. त्यात प्रामुख्याने विद्यमान नगरसेवकांचाच समावेश आहे.