सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मागण्याच्या मुद्यासंदर्भात शहर शिवसेनेने गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांची भेट घेऊन चूक निदर्शनाश आणून दिल्याने परिपत्रकातील झालेली चूक मान्य करून त्यांनी दिलगिरी व्यक्त करून सर्व सेवानिवृत्तांची माफी मागितली, अशी  माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी दिली.
शासनाच्या १८ मे २०१३ च्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जाती, भटक्याा/ विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची गरज नसताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जे परिपत्रक निघाले त्यात सर्वच मागासवर्गीयांना जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागेल असे चुकीने नमूद केले आहे. शिवसेनेने गेल्या पाच दिवसांपूर्वी ही चूक जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. गुरुवारी शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटले असता त्यांनी त्वरित चुकीची दुरुस्ती करून नवीन परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले व दिलगिरी व्यक्त केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू थुटे उपस्थित होते. त्यामुळे आता सेवानिवृत्तांपैकी जे अनुसूचित जात, भटक्या/ विमुक्त जात व इतर मागासवर्गीयांमध्ये येतात त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देणाची गरज नाही. कोणत्याही शासकीय कार्यालयात अशी मागणी केल्यास त्यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा, असे सेवानिवृत्तांना आवाहन करण्यात आले आहे.
शिष्टमंडळात शहर प्रमुख मंगेश काशीकर, जिल्हा परिषद सभापती नंदा लोहबरे, मनपाच्या सभापती मंगला गवरे, मनपा गटनेत्या शीतल घरत, उपजिल्हा प्रमुख राधेश्याम हटवार, नगरसेवक जगतराम सिन्हा, उपजिल्हा संघटिका अंजली देव व कुसुम शिंदेकर, दिगंबर ठाकरे, प्रमोद मोटघरे, प्रवीण सांदेकर, नंदू थोटे, दीपक आदमने, संजय मेहरकर, प्रवीण राऊत, प्रवीण काकडे, चिंटू महाराज, वसंता आष्टनकर, आशीष राऊत, राम कुकडे, राजकुमार धनरे, अरविंद यादव, राजेश जमदारे, अशोक अंतुरकर आदी उपस्थित होते.