केंद्रीय मंत्री कमलनाथ यांची सूचना
मेट्रोबरोबरच मोनो रेल आणि बीआरटी असा एकात्मिक प्रकल्प पुणे शहरात राबवण्याची सूचना केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी केली असून तशी प्रक्रिया लवकरात लवकर झाल्यास तसेच मेट्रो अहवालातील त्रुटी दूर झाल्यास केंद्राकडून मेट्रोसाठी तातडीनेनिधी देण्याचीही तयारी दर्शविण्यात आली आहे. मात्र, मोनो रेलचा प्राथमिक अहवालही अद्याप तयार नसल्यामुळे ही प्रक्रिया किती काळात पूर्ण होणार याबाबत तूर्त तरी अनिश्चितताच आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पासंबंधी चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन केले होते. केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पुणे व पिंपरीतील मेट्रो प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रारंभी आयुक्त महेश पाठक यांनी मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण केल्यानंतर मेट्रो प्रकल्प स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) स्थापन करून राबवायचा असल्यामुळे त्या कंपनीची स्थापना व अन्य प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, म्हणजे केंद्राकडून मेट्रो प्रकल्पासाठीचा निधी लवकरात लवकर दिला जाईल, असे कमलनाथ यांनी सांगितले.
पुणे आणि िपपरी महापालिकांनी एसपीव्हीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी आणि एसपीव्हीचे एक आदर्श स्वरूप उभे करावे तसेच या एसपीव्ही मार्फत मेट्रो, मोनो रेल आणि बीआरटी या तिन्ही वाहतूक व्यवस्था राबवल्या जाव्यात, अशी सूचना कमलनाथ यांनी यावेळी केली. मेट्रो आणि मोनो रेल प्रकल्प एकत्रितपणे राबवला गेला पाहिजे. त्याचा एकात्मिक आराखडा तयार करून त्याला राज्य शासनाची मंजुरी घ्या व तो केंद्राला सादर करा. म्हणजे केंद्रामार्फत लगेचच निधीची उपलब्धता करून दिली जाईल, असेही कमलनाथ यांनी
सांगितले.
प्रकल्प केव्हा सुरू करणार व तो केव्हा पूर्ण होणार याची मुदत महापालिका आणि राज्य शासनाने निश्चित करून घ्यावी, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
बैठकीत शरद पवार यांच्यासह महापौर वैशाली बनकर, पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे, खासदार सुरेश कलमाडी, वंदना चव्हाण, प्रकाश जावडेकर, उपमहापौर दीपक मानकर, पिंपरीचे उपमहापौर राजीव मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, सभागृहनेता सुभाष जगताप, पिंपरीच्या सभागृहनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेता वसंत मोरे, गटनेता अरविंद शिंदे, अशोक येनपुरे, अशोक हरणावळ, डॉ. सिद्धार्थ धेंडे, आयुक्त महेश पाठक, पिंपरीचे आयुक्त श्रीकर परदेशी, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोनो रेलची फक्त चर्चा; अद्याप अहवालही नाही
मेट्रो बरोबरच पुण्यात मोनो रेलही सुरू करा, अशी सूचना केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी केली असली, तरी मोनो रेलबाबत प्रत्यक्षात कार्यवाही मात्र झालेली नाही. मोनो रेल करण्याबाबत आतापर्यंत चर्चा झाली आहे, तसेच मोनो रेल करावी असा ठरावही महापालिकेत मंजूर झालेला आहे. मात्र, त्यासाठी मोनो रेलचा प्रकल्प अहवाल करून घेणे, मार्गाची निश्चिती करणे, खर्चाचा आढावा घेणे, जागा निश्चित करणे, त्यासाठी आरक्षण दर्शविणे वगैरे कामे झालेली नाहीत. त्यामुळे मोनो रेल तूर्त तरी फक्त चर्चेच्याच स्तरावर आहे.