स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी केलेल्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे केंद्र व राज्य शासनाची मदत साखर कारखान्यांना मिळणार आहे. मात्र, कारखानदार मदत आमच्यापर्यंत पोचली नसल्याचे सांगत आहेत. ती मदत कशी मिळवायची, ही त्यांची जबाबदारी आहे. केंद्रात आणि राज्यात कारखानदारच सत्तेत आहेत. त्यांनी ती मदत मिळवावी. १२ टक्के साखर उता-याला एफआरपीप्रमाणे २ हजार ६५० रुपये सरासरी मिळतात. ते मिळण्यासाठी आम्ही साखर आयुक्तांकडे दाद मागणार आहोत. एकरकमी २ हजार ६५० ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही १ जानेवारीला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिली.
कराड वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सयाजीराव पाटील यांच्यातर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आर्थिक मदत सुपूर्द करण्याचा तसेच, ऊसदर आंदोलनादरम्यान अटक झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार वकील संघटनेमध्ये करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत मोहिते, सचिव हरिश्चंद्र काळे यांच्यासह वकील, कार्यकर्ते उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, की सर्वसामान्य शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही आंदोलने केली. त्याचे फळ शेतक-यांना मिळत आहे. मात्र, पोलिसांनी शेतक-यांना व त्यांच्या मुलांना अमानुषणे मारहाण करून त्यांना अटक केली. कराडच्या वकिलांनी आमच्या कार्यकर्त्यांंना मोफत सोडले. जनतेतील सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा आमच्या आंदोलनाला आहे.