News Flash

विभागातील टँकरची संख्या हजाराच्या उंबरठय़ावर

* टंचाईग्रस्त गावे झाली दुप्पट * नाशिक व नगरमध्ये संकट अधिक गहिरे टळटळीत उन्हामुळे जिवाची काहिली होत असतानाच दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या नाशिक विभागातील गावांची संख्याही तितक्याच झपाटय़ाने

| April 26, 2013 02:55 am

* टंचाईग्रस्त गावे झाली दुप्पट
* नाशिक व नगरमध्ये संकट अधिक गहिरे
टळटळीत उन्हामुळे जिवाची काहिली होत असतानाच दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या नाशिक विभागातील गावांची संख्याही तितक्याच झपाटय़ाने वाढत आहे. साधारणत: महिनाभरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या गावांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून त्यामुळे त्याच प्रमाणात टँकरची संख्याही विस्तारली आहे. सद्य:स्थितीत विभागातील टँकरचा आकडा हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. मागील महिन्यात विभागात तब्बल ३९८ गावे आणि ११८१ वाडय़ांना ४४४ टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात होता, परंतु जसजसे ऊन तापत आहे, तसतसे या गावांची संख्या आता ७६६ गावे व २३६२ पाडय़ांपर्यंत जाऊन धडकली आहे. अद्याप संपूर्ण मे महिना बाकी असल्याने दुष्काळाच्या कचाटय़ात सापडणाऱ्या गावांची आणि पर्यायाने टँकरची संख्या आणखी वृद्धिंगत होण्याची चिन्हे आहेत. पाण्याबरोबर गुरांसाठीच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण भटकंती होत असूनही उत्तर महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात आजतागायत चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. विभागात केवळ नगर जिल्ह्यात ३६० चारा छावण्यांमध्ये दोन लाख २५ हजार ३९२ जनावरे असल्याची माहिती विभागीय टंचाई शाखेने दिली आहे.
मार्चच्या प्रारंभापासून उन्हाचा तडाखा बसू लागल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. एप्रिलमध्ये तापमानाने हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केल्यानंतर पाण्याचे संकट अधिकच गहिरे झाले. ग्रामीण भागातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी दिवसागणिक वाढत आहे. मागील महिन्यात संपूर्ण विभागात एकूण ४४४ टँकरच्या माध्यमाने ३९८ गावे व ११८१ वाडय़ांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. एप्रिलच्या अखेरीस ही संख्या ९१६ टँकरवर जाऊन पोहोचली. सध्या विभागातील ७६६ गावे आणि २३६२ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती टंचाई शाखेने दिली आहे. विभागात टंचाईची सर्वाधिक झळ नगर व नाशिक जिल्ह्याला बसली आहे. विभागात टँकरची सर्वाधिक म्हणजे ५७५ इतकी संख्या एकटय़ा अहमदनगर जिल्ह्यात आहे. या भागातील ४२४ गावे व १७७० वाडय़ांना दररोज उपरोक्त टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही टंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. या जिल्ह्यातील २२२ गावे व ५९२ वाडय़ांना २३३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नसून ११६ गावांना १०४ टँकरद्वारे, तर धुळे जिल्ह्यात चार गावाला चार टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
शासनाने टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर करताना हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर केलेल्या तालुक्यातील मंडळस्तरावर एक चारा छावणी उघडण्याचा अंतर्भाव होता. परंतु या निकषाची उत्तर महाराष्ट्रात अंमलबजावणी का झाली नाही याची स्पष्टता होत नाही. नाशिक विभागात नगर वगळता इतरत्र कुठेही गुरांसाठी चारा छावणी नसल्याचे दिसत आहे. नगर जिल्ह्यात ३६० चारा छावण्या सुरू आहेत, परंतु नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात एकही चारा छावणी उघडण्याची गरज यंत्रणेला वाटलेली नाही. या परिसरात चाऱ्याची उपलब्धता असल्याने छावणी उघडण्यात आली नसल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यातील चारा छावण्यांमध्ये लहान २७,५९० आणि मोठी १,९७,८०२ अशी एकूण दोन लाख २५ हजार ३९२ जनावरे आहेत.
दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी शासनाने ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील २३२६ गावांची यादी जाहीर करून त्या गावांमध्ये टंचाईसदृश स्थिती असल्याचे जाहीर केले होते. या गावांसाठी वेगवेगळ्या सवलती शासनाने जाहीर केल्या आहेत. ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके बसत असताना शासनाच्या निकषामुळे टंचाईचे संकट भेडसावणाऱ्या काही गावांना सवलतींचा लाभ मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ११७६ गावे जळगाव जिल्ह्यात असून सर्वात कमी २४५ गावे धुळे जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यातील ९०२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नसल्याचे यादीवरून लक्षात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:55 am

Web Title: tankers numbers goes around one thousand
Next Stories
1 हनुमान जयंती उत्साहात
2 नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्समधील ‘त्रिमूर्ती’
3 व्यसनमुक्तीसाठी तंटामुक्त गाव समित्यांकडून जनजागृती
Just Now!
X