मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड गावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात साखर सम्राटांना कोल्हेकुई करायला लावणारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार अजूनही अर्धवट वाटेवर आहे. कालच्या ऐतिहासिक मोर्चाने आंदोलनाच्या गर्दीचे उच्चांक मोडीत राज्यकर्त्यांसह साखर कारखानदारांची झोप उडवत काही अंशी यश पदरात पाडून घेतले आहे. सुरूवातीला आंदोलनाचा हा बार फुसका निघेल अशी संबंधितांना आशा होती. परंतु, या आक्रमक आंदोलनाने अपेक्षित प्रतिसाद खेचल्याने मुख्यमंत्र्यांसह काही बडय़ा नेत्यांना एक पाऊल मागे जाणे भाग पडताना, सकारात्मक भूमिका घ्यावी लागली आहे. दरम्यान, हंगाम उशिरा सुरू होत असल्याने त्याचा फटका साखर उद्योगातील सर्वच घटकांना बसणार असल्याचा मुद्दा कळीचा ठरतो आहे.  
सर्वसामान्य ऊसउत्पादकांनी राज्यकर्ते व साखर कारखानदारांविरूध्द आपल्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेला हा संघर्ष अगदीच टोकाला जाईल असे सुरूवातीला चित्र नव्हते. परंतु, नोव्हेंबर महिना निम्मा संपत आला तरी ऊसदरावर रोखठोक भूमिका न घेण्याची गंमत राज्यकर्ते व साखर कारखानदारांकडून केली गेल्याने  शेतकरी चिडला. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठय़ा चातुर्याने ऊसदराचे आंदोलन कराडमध्ये घेऊन एका दगडात अनेक पक्षी पाडले. संघटनात्मक राजकारणात ‘स्वाभिमानी’ला कायमच नडणाऱ्या महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी राज्यकर्त्यांच्या हातात हात घालून ऊसदर आंदोलनातील हवा काढण्याचा प्रयत्न केल्याच्या भावनेतून मुख्यमंत्र्यांच्या गावातच आंदोलनातून ताकद दाखवून त्याचे उट्टे काढले आहे. तर, पवार चुलत्या, पुतण्यांना लाखोली वाहात साखर सम्राटांचाही उध्दार झाल्याने शेतकऱ्यांचा त्यांच्याच प्रस्थापित नेत्यांवरील राग व्यक्त होवून आगामी काळात येथील एकतर्फी निकालाला छेद मिळेल का, याची चाचपणी स्वाभिमानीच्या संगतीत राहून महायुती व मनसेच्या गोटाने साध्य केली आहे.
गतवर्षी ऐन दिवाळीत शेतकरी संघटनांनी ऊसदरवाढीच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन छेडून काही अंशी समाधानकारक ऊसदर पदरात पाडून घेतला होता. या पाश्र्वभूमीवर या खेपेस सारेच सामंजस्याने घेऊन ऊसदराची तड लावतील असा सूर होता. मात्र, साखर सम्राटांनी अंतर्गत युती करून शासनावर दबावतंत्र वापरल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून होऊ लागली. अशातच नामी ताकद असलेल्या राजू शेट्टीं यांच्या नेतृत्वाला डावलून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शेट्टींचे प्रतिस्पर्धी असलेल्या रघुनाथदादा पाटील व शंकरराव गोडसे यांच्याशी चर्चा करून बसले. ही चर्चा खऱ्या अर्थाने व्यवहार्य होती. परंतु, चर्चेदरम्यान, अलबेल असल्याचा आणि सेटलमेंट झाल्याचा गवगवा झाल्याने मुख्यमंत्री आणि रघुनाथदादांच्या समर्थकांची भूमिका बाजूला फेकली गेली. तसेच, स्वाभिमानीचे नेते व कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. आजवर कोल्हापूर आणि सांगली संघर्षभूमी करणाऱ्या राजू शेट्टी व सदाभाऊं नी मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मैदानावर रान उठवून आव्हान दिले. एकंदर वातावरणाचा अंदाज घेऊन प्रारंभी मनसे आणि पाठोपाठ महायुतीच्या मित्रपक्षांनीही आंदोलनात उडी घेऊन शेतकऱ्यांबद्दल कळवळा आळवला. आता, मुख्यमंत्र्यांनी या एकजुटीसमोर काही अंशी नरमाईची भूमिका घेऊन, समाधानकारक ऊसदरासाठी पंतप्रधानांना भेटणे आणि त्यांची सवलतीची तसेच, आर्थिक मदत घेऊन शेतकऱ्यांच्या ऊसदराला हातभार लावण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, यावरही अविश्वास व्यक्त करून शेट्टी यांनी कराडातील आंदोलन तूर्तास स्थगित करून दहा दिवसांच्या मुदतीत उचित ऊसदरासाठी मुदत दिली आहे. यादरम्यान, साखर कारखान्यांचे गळीत मात्र ठप्प राहणार असल्याने साखर पट्टय़ात या एकंदर घटनाक्रमाने गोंधळाचे,तर साखर उद्योगात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.