‘काळूबाईच्या नावाने चांगभले’च्या जयघोषात मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेत मोठय़ा उत्साहात किमान तीन लाख भाविकांनी आज देवीचे दर्शन घेतले. यात्राकाळातील अनिष्ट रूढी व प्रथा रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पाऊल उचलले आहे.
पहाटे साडेपाचच्या दरम्यान मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण उपाध्ये, ट्रस्टचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश प्रमोद जोशी यांच्या हस्ते सपत्नीक काळूबाईची महापूजा बांधण्यात आली. या वेळी देवस्थानचे सर्व विश्वस्त प्रांताधिकारी सूरज वाघमारे, तहसीलदार सुनील चंदनशिवे, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर धस आदी उपस्थित होते. या वेळी प्रथम यात्रेकरूचा मान सोलापूरचे भाविक महेश व धनश्री सोनावले यांना मिळाला. ट्रस्टच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यात्रा परिसराला आज दुपारी जिल्हाधिकारी रामास्वामी एन. व पोलीस अधीक्षक प्रसन्ना यांनी भेट दिली व नियोजनाप्रमाणे प्रशासनाकडून कार्यवाही होत आहे याची खात्री करून घेतली. मंदिराचा जीर्णोद्धार करावा, शेगाव अथवा त्यापेक्षा चांगले मंदिर ट्रस्टने बांधावे असे सुचविले.
आज पौष पौर्णिमा असल्याने रात्री बारा वाजता वाजतगाजत काळूबाईचा छबीना गावातून निघाला होता. छबीन्यामध्ये ग्रामस्थांसह अनेक भाविकही सामील झाले होते. पहाटे दोनच्या दरम्यान गावप्रदक्षिणा करून पालखी मंदिराजवळ आली. दर्शनासाठी रात्रभर भाविकांनी गर्दी केली होती. ऐन थंडीतही मोठय़ा संख्येने भाविक गडावर येत होते. पहाटे साडेपाचच्या दरम्यान महापूजा झाली. सकाळी संपूर्ण दर्शनरांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. किमान साडेचारशे च्यावर पोलीस फौजफाटा यात्रेसाठी मांढरदेव येथे तनात करण्यात आला आहे. यात महिला पोलिसांची संख्याही चांगलीच आहे. याशिवाय वाई व मुंबईतील अनिरुद्ध डिझास्टर मॅनेजमेंटचे स्वयंसेवक भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. मंदिर परिसरात व महाद्वारापासून हे कार्यकत्रे भाविकांना मदत करत आहेत.
यात्रेसाठी बुधवारी रात्रीपासूनच वाईच्या गणपतीघाटावर हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेमुळे वाईतील अनेक लॉजेस फुल्ल झाले होते. वाईतून मांढरदेवकडे जाताना एमआयडीसी नाक्यावर चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तेथे सर्व गाडय़ांची तपासणी करूनच गाडय़ा मांढरदेवकडे सोडण्यात येत आहेत . तर भोर येथेही वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. वाद्य्ो असल्यास ती तेथेच उतरवून घेतली जात आहेत. वाहनांचे गॅस सिलिंडरही काढून घेण्यात येत आहेत. वाई व भोर घाटात आरटीओसह वाहतूक पोलीस व गाडय़ा बंद पडल्यास ओढण्यासाठी क्रेन ठेवण्यात आल्या आहेत. उद्या शुक्रवारी भाविकांची गदी वाढण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे.
पशुहत्येविरोधात कडक कारवाई
मंदिर व यात्रा परिसरात पशुहत्या, दारूविक्री, झाडाला लिंबू ठोकणे, काळय़ा बाहुल्या खिळय़ांच्या साहाय्याने ठोकणे, करणी करणे, वाद्य वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनिष्ट रूढी व प्रथा रोखण्यासाठी या वेळी खंबीर पावले उचलण्यात आली आहेत. वाई व भोर परिसरातील दारू दुकाने यात्राकाळात तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.