गुण पडताळणीपेक्षा पुनर्मूल्यांकनानंतर निकालात अधिक बदल
दहावीच्या निकालाविषयी साशंकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुण पडताळणी तसेच उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी गतवेळच्या अहवालावर नजर टाकल्यास गुण पडताळणीपेक्षा पुनर्मूल्यांकनानंतर निकालात अधिक बदल होत असल्याचे लक्षात येते. मागील वर्षी मंडळाने ५१ विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज करताना चूक केली होती. पडताळणीत संबंधितांच्या निकालात झालेल्या बदलाने त्यावर शिक्कामोर्तब केले. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनात ५०३ विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाले.
दहावीचा निकाल घाईघाईत जाहीर केल्यामुळे त्यात अनेक त्रुटी

राहिल्याचे निष्पन्न झाले आहे. निकालाबद्दल साशंकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिवाय, आपण लिहिलेल्या उत्तरांना कसे गुण मिळाले, याचे अवलोकन स्वत: विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकदेखील उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींद्वारे करू शकतात. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम या छायाप्रती मिळविणे बंधनकारक आहे. त्यानंतर विहित शुल्कासह अर्ज भरता येतो. मागील वर्षी गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन या दोन्ही बाबींसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अहवालावर नजर टाकल्यास पडताळणीपेक्षा पुनर्मूल्यांकनात निकालात अधिक बदल झाल्याचे दिसते. मागील वर्षी संपूर्ण राज्यातून ८६३२ विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी अर्ज केले होते. त्यातील १२३ विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाले. त्याचे प्रमाण १.४३ टक्के इतके होते. मंडळाने दिलेल्या या माहितीवरून उपरोक्त विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवरील गुणांची बेरीज करताना तपासनीसांकडून चूक झाली. यामुळे मंडळाला त्यांचे निकाल दुरुस्त करून द्यावे लागले. त्यात पुणे विभागीय मंडळातील ९, नागपूर ३, औरंगाबाद ५, मुंबई २०, कोल्हापूर १, अमरावती ५, नाशिक २, लातूर ६ असा समावेश आहे. गतवर्षीच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन अहवालात मात्र वेगळेच चित्र आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी राज्यातून ८४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ५०३ विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाले. त्याची टक्केवारी ५९.५३ आहे. निकाल व गुणात बदल झालेल्यांमध्ये पुणे विभागीय मंडळात ६९, नागपूर ५०, औरंगाबाद ४८, मुंबई १००, कोल्हापूर ४८, अमरावती ७३, नाशिक ४४, लातूर ५४ आणि कोकण विभागीय मंडळातील १७ जणांचा समावेश आहे.

गुण पडताळणी व पुनर्मूल्यांकनातील फरक
उत्तरपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला देण्यात आलेल्या गुणांची बेरीज आणि त्या विषयाला मिळालेले एकूण गुण ही आकडेवारी बरोबर आहे की नाही, याची खातरजमा गुण पडताळणीमध्ये तपासली जाते. पुनर्मूल्यांकनात मात्र उत्तरपत्रिकेची तज्ज्ञ समितीकडून पुन्हा तपासणी केली जाते. तत्पूर्वी, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवावी लागते. ही प्रत मिळविल्यानंतर तज्ज्ञ शिक्षकाकडून ती तपासून घ्यावी लागते. त्यांच्याकडून शेरा मिळाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतो. मग, मंडळाच्या तज्ज्ञ समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची तपासणी केली जाते.