लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना एकीकडे नेत्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या विशेषत: धान्याच्या भाववाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यांच्यापुढे ‘दालरोटी’चाच प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या निवडणुकीचा माहोल आहे. मतदारांना खूश करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अन्न सुरक्षा विधेयक आणून गोरगरिबांना कमी दरात धान्य देऊ असे आश्वासन दिले आहे. मतदारांना खूश करणे हे सर्वच पक्षांचे लक्ष्य असले तरी मतदारांना प्रत्यक्षात ‘दालरोटी’साठी आर्थिक संघर्ष करावा लागतो आहे.
गारपिटीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने भाज्यासहीत सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. विशेषत गहू, डाळी आणि विविध कडधान्याच्या दरात वाढ होत असून धान्यांचे भाव तर झपाटय़ाने वधारत आहेत. तूर आणि चणा डाळीच्या भावात अचानक १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे आता सर्वसामान्यांची ‘दालरोटी’ पुढील काही दिवसात आणखी महागण्याची शक्यता आहे. डाळीबरोबरच इतर धान्यांच्या किमतीतही वाढ झाल्याने आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशावर चांगलाच बोजा पडणार आहे. दैनंदिन अन्न पदार्थात वापरण्यात येणाऱ्या तूरडाळीला सध्या घाऊक बाजारात ६ ते ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहे. सामान्यपणे तुरडाळीचा भाव साडेचार हजारापर्यंत असतो मात्र, यंदा डाळीने सात हजारांची पातळी गाठली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली घट हे भाववाढीचे कारण बाजारपेठेतून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सध्या निवडणुकांचा माहोल असल्याने अनेक राज्यांमध्ये डाळीचा मोठय़ा प्रमाणात साठा करण्यात येत आहे. मतदारांना खूश करण्यासाठी हीच डाळ स्वस्त धान्य दुकानातून विकण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत डाळीचा तुटवडा निर्माण झाला असून किमतीतही सतत वाढ होत आहे. घाऊक बाजारपेठेत झालेल्या वाढीचा परिणाम किरकोळ बाजारातही झाला असून डाळींच्या किमती ३५ ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत.
तूर डाळीबरोबर मुगाच्या डाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे. नवीन तूर गावरानी डाळ ४ हजार ३००, कर्नाटकमधून येणारी ४ हजार ४५०, चांगल्या दर्जाची डाळ हा ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपयाला विक्रीला आहे. दोन महिन्यांपूर्वी साडेचार हजारापर्यंत असलेले भाव आता ५ हजारांवर गेले आहेत. उडीद डाळीचे भाव ५ हजारांवर गेल्याने सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे.
सर्वच डाळीचे दर वाढत असल्या तरी चणा डाळीच्या भावात सध्या वाढ झाली नाही. मात्र, येत्या दोन महिन्यात या डाळीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त करण्यात येत आहे. उन्हाळा सुरू झाला असल्याने धान्य खरेदीला विशेष प्राधान्य असते. मात्र, यंदा डाळीसह इतरही जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा बाजारात विशेष गर्दी दिसून येत नसल्याचे म्हणणे आहे. ग्राहक भाव कमी होण्याची वाट बघत असले, तरी सध्या तरी भाव कमी होण्याची काहीच अपेक्षा नसल्याचे होलसेल ग्रेन मर्चंटस असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.