सिडकोने गेली अनेक वर्षे गृहनिर्माण योजना राबविण्याकडे केलेले दुर्लक्ष भरून काढण्यासाठी खारघर, घणसोली, तळोजा या भागात १२ हजार घरे बांधण्याचा संकल्प केला असून त्यातील अल्प उत्पन्न व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांना दीडऐवजी अडीच वाढीव चटई निर्देशांक देण्यात यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे. याशिवाय रस्ते विकास महामंडळाला पूवऱ् समुद्र किनाऱ्यावर जलवाहतूक सुरू करण्यासाठी ४८२ कोटी रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सिडकोनेही प्रकल्पग्रस्त तसेच सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय घेण्याचा सपाटा लावला असून बुधवारी मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नवी मुंबई विमानतळ कामाच्या जागतिक पातळीवरील निविदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात काढल्या जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी निर्णयाबरोबरच नवी मुबंईत प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करताना त्यांना २०० मीटरची घातलेली अट काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे गावांचा विकास करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात यावे, असेही सुचविण्यात आले आहे. त्यासाठी गावांना चार एफएसआय हवा ही जुनी मागणी सिडकोच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती सिडकोचे संचालक नामदेव भगत यांनी दिली. यापूर्वी २००७ पूर्वीची  बांधकामे नियमित करण्यात येणार होती. आता डिसेंबर २०१२ पर्यंतची बांधकामे कायम करण्यात येणार आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील बेरोजगारांना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि थेट स्वयंरोजगार दिला जाणार असून हे प्रशिक्षण केवळ विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव न ठेवता सर्वासाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी भगत यांनी केली आहे. सिडकोने शहरात एक लाख २३ हजार घरे दीड एफएसआय वापरून बांधली आहेत. सिडकोला लहान घरांसाठी शासनाने जादा एफएसआय दिल्यास त्याच ठिकाणी सिडको गरिबांसाठी जादा घरे बांधू शकेल, असा युक्तिवाद सिडकोने केला असून तीन एफएसआय मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय म्हणून रस्ते विकास महांडळाच्या वतीने पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर जलवाहतूक उभारणार आहे. वांद्रेपर्यंतच्या कामाची निविदा महामंडळाने काढली आहे. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया ते नेरुळ या पूर्व सागरी किनाऱ्यावर जलवाहतूक सुरू करण्साठी सिडकोकडे निधी मागण्यात आला होता. तो सिडकोने मंजूर केला आहे. त्यामुळे नवी मुंबईला लवकरच बंद पडलेली जलवाहतूक मिळणार आहे. मेट्रो आगार उभारण्यासाठी खारघर येथे ६७ कोटी मंजूर करण्यात आले असून द्रोणागिरी येथे शासनाच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी पाच हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पनवेल आरटीओला करंजाडे येथे जागा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे भगत यांनी सांगितले.
श्रेयावरून चढाओढ
निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही काँग्रेसमध्ये कामांचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू झाली असून त्याचा प्रत्यय सिडकोत आला. बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीतील काही महत्त्वाचे विषय अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी काही पत्रकारांना सांगितले. त्यात काँग्रेसच्या नामदेव भगत यांना कुठेही स्थान दिले गेले नाही. त्यामुळे भगत यांनी शुक्रवारी सिडको मुख्यालयातील आपल्या दालनात बैठक घेऊन संचालक मंडळातील सर्व मंजूर कामांची जंत्री वाचून अध्यक्षांना ‘हम भी कुछ कम नही’चा संदेश दिला. सिडकोची इमेज वाढविण्याचे काम सिडकोच्या जनसंपर्क विभागाचे आहे, पण हा विभाग अकार्यक्षम आणि भलत्याच कामात तरबेज असल्याची टीकाही भगत यांनी केली.