मूकबधिर शाळेत लिपीकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्हय़ातील एका बेरोजगार तरुणाला चार लाखांचा गंडा घालून फसवणूक केल्याप्रकरणी कृषी अधिकारी व संस्थाचालकासह तिघाजणांविरूध्द विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात माचप्पा आळप्पा पाटील (वय २१, रा. िलगनूर, ता. मिरज, जि. सांगली) या फसवणूक झालेल्या बेरोजगार तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार सोलापुरात प्रतापनगर लमाण तांडा येथे सोनामाता नगरात कोमल मूकबधिर शाळा शाम राठोड हा चालवितो. ही शाळा विनाअनुदानित असताना ती शंभर टक्के अनुदानित आहे, अशी थाप मारून शाळेत लिपीक भरती केली. त्यासाठी कृषी अधिकारी भीमराव शंकर निकम व शिक्षक आण्णप्पा श्रीपती िशदे यांनी माचप्पा पाटील यास कोमल मूकबधिर शाळेत लिपीकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संस्था चालक शाम राठोड याच्याशी भेट घडविली. या तिघाजणांनी माचप्पा पाटील याच्याकडून नोकरी लावण्यासाठी चार लाखांची रक्कम उकळली. त्यास नेमणूकपत्र दिले. परंतु शाळा विनाअनुदानित असल्याने आपली फसवणूक झाल्याचे पाटील याच्या लक्षात आले. त्याने आपली घेतलेली चार लाखांची रक्कम परत मागितली असता त्यास खोटा धनादेश दिला गेल्याचे फिर्यादी नमूद केले आहे