महिला सरपंचाला घरात घुसून मारहाण

हरेगाव, उंदिरगाव परिसरात दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या उंदिरगावच्या महिला सरपंच चंद्रभागा चंद्रभान गायकवाड यांना आज सायंकाळी घरात घुसून मारहाण करण्यात आली.

हरेगाव, उंदिरगाव परिसरात दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या उंदिरगावच्या महिला सरपंच चंद्रभागा चंद्रभान गायकवाड यांना आज सायंकाळी घरात घुसून मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून त्यांना व कुटुंबीयांना याबाबत धमकावले जात होते. मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फटका आज गायकवाड कुटुंबीयांना बसला. याबाबत तालुका पोलिसांनी चार महिलांसह नऊ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
मालन अशोक गायकवाड, हीरा लक्ष्मण गायकवाड, बेबी बाबासाहेब गायकवाड, सविता सचिन गायकवाड, बाबा काशिनाथ गायकवाड, अशोक बाबूराव गायकवाड, सचिन लक्ष्मण गायकवाड, ज्ञानदेव बंडू फुलारे व लक्ष्मण सावळा गायकवाड (सर्व रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सरपंच गायकवाड आपली मुले रवि, प्रदीप व सुना यांच्यासह घरी काम करीत होत्या. यावेळी वरील आरोपींनी घरात घुसून तू आमच्या विरोधात पोलिसांना माहिती देतेस, अर्ज करतेस, दररोज पोलिसांना फोन करतेस असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. या वेळी रवि, प्रदीप व सून अलका यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही मारहाण केली.
गेल्या महिनाभरापासून चंद्रभागा गायकवाड यांच्या पुढाकाराने उंदिरगाव, हरेगाव व माळेवाडी परिसरातील महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीसाठी आवाज उठविला. आंदोलने केली. सुरुवातीला दाद न देणाऱ्या पोलिसांनी नंतर कारवाईचा फार्स केला. आज झालेल्या मारहाणप्रसंगी पोलीस घटनास्थळी हजर होते. मात्र त्यांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही, असे सरपंच चंद्रभागा गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उंदिरगाव, माळेवाडी, हरेगाव व गोंधवणीचे ७ दारूअड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. याचा राग मनात धरूनच हा हल्ला करण्यात आल्याचेही गायकवाड म्हणाल्या.
या प्रकरणी मालन अशोक गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंद्रभागा गायकवाड, रवींद्र गायकवाड व प्रदीप गायकवाड यांच्याविरुद्ध दुसरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस हवालदार मोहन भोसले करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beating to female sarpanch

ताज्या बातम्या