सोलापुरात पाण्यासाठी नागरिकांनी अभियंत्याच्या गाडीची हवा सोडली

शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसाआड करून देखील त्यात योग्य नियोजनाचा अभाव असल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरूच आहेत.

शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसाआड करून देखील त्यात योग्य नियोजनाचा अभाव असल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरूच आहेत. शेळगी येथील धोत्रीकर वस्ती परिसरात पाणी प्रश्न सुटत नसल्याचे पाहून संतापलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता बी. एस. अहिरे यांच्या मोटारीच्या चाकाची हवा सोडली.
तीन दिवसाआड पाणीपुरवठा करूनसुध्दा त्यात समन्वयाचा तथा नियोजनाचा अभाव असल्याने व त्याबद्दल पालिका प्रशासन सुधारणा करण्याऐवजी ढिम्मच असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. शेळगी परिसरात पाणीपुरवठा नसल्याने स्थानिक नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. या प्रश्नावर भाजपचे स्थानिक नगरसेवक अविनाश पाटील व संजय कणके यांच्यासह सुमारे ७५ नागरिकांनी पालिकेच्या विभागीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याचवेळी सार्वजनिक आरोग्य अभियंता अहिरे यांनीही या विभागीय कार्यालयात येऊन नागरिकांच्या भावना समजावून घेतल्या. त्यांना प्रत्यक्ष पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी धोत्रीकर वस्ती भागात नेण्यात आले. मात्र त्याठिकाणी नागरिकांसमोरच सार्वजनिक आरोग्य अभियंता अहिरे व त्यांचे सहकारी उपअभियंता नागणे यांच्यात वाद झाला. दोघेही एकमेकास तावा-तावाने बोलू लागल्याने नागरिकही संतापले. त्यातूच अहिरे यांच्या वाहनाच्या चाकाची हवा सोडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Engineer vehicles tyre punctured by citizen in solapur