शरीरातून प्राण निघून गेलेल्या व्यक्तीला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी हजारो लोक गर्दी करीत असल्याचे दृष्य एकीकडे पहायला मिळाले असतांनाच दुसरीकडे मात्र अपघातग्रस्त झालेल्या, पण शरीरात प्राण असून तडफडत असलेल्या व्यक्तीच्या मदतीला मात्र कोणी थांबत नसल्याचे दुसरे दृष्य मानवाच्या अनाकलनीय स्वभावाची आठवण करून देत असल्याचा अनुभव सोमवारी अनेकांनी घेतला.
 कार अपघातात मृत्यूमुखी पडलेले काँग्रेसचे आमदार निलेश पारवेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता यावे म्हणून पारवा येथे अक्षरश हजारो लोक जमले होते. अंत्यसंस्कार आटोपून यवतमाळकडे गर्दीचा महापूर आपापल्या वाहनांनी परतीला निघाला. दरम्यान, कोळंबी गावाजवळ रस्त्याच्या कडेला एक गृहस्थ मोटरसायकल अपघातात जखमी होऊन पडला असल्याचे अनेकांनी पाहिले. त्याला पाहून वाहने भरधाव वेगाने निघून जात होती, पण मदतीला कोणीही आले नाही. अखेर एक सामाजिक कार्यकत्रे व शिक्षक साहेबराव पवार यांच्या दृष्टीस तो अपघातग्रस्त ग्रहस्थ दिसला. पवार यांनी आपली इनोव्हा गाडी थांबवून गाडीत असलेल्या आईवडिलांना दुसऱ्या वाहनाने यवतमाळला पाठवले आणि अपघातग्रस्त इसमाला आपल्या गाडीतून यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळहून त्याला नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे त्याचे प्राण वाचले. राहुल नामदेव वावरे (३०) असे या जखमी तरुणाचे नाव असून तो घाटंजी तालुक्यातील कोळंबीचा राहणारा आहे. मानवी स्वभावाचे एक वेगळेच दर्शन या निमित्याने अनेकांना अनुभवता आले, हे मात्र खरे.