महसूल विभाग हा सरकारचा चेहरा असतो व याच विभागाच्या कामगिरीवर सरकारची प्रतिमा अवलंबून असते. या विभागाने लोकांना योग्य सेवा दिली नाही तर लोकांचा सरकारवरील राग वाढतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक कार्यक्षमतेने काम करावे व लोकांना चांगल्या सेवा पुरवाव्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बांधण्यात आलेल्या बचत भवनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, राज्य शासनाने दर्जेदार सेवा पुरविण्याबाबत कायदा केला आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे व पारदर्शकतेने काम करून लोकांना आवश्यक त्या सेवा पुरवाव्या. जिल्हा नियोजन समितीकरिता निधी वाढवून देण्याबाबतही विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निधी वाढवून देण्याची विनंती केली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशासनावरील नियंत्रण कमी होत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे प्रास्ताविकादरम्यान केली. जिल्हा, उपविभाग, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशासनावर पुरेसे नियंत्रण नसल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, सुधाकर कुंभारे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, नागपूर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व इतर अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.