कल्याणमधील चार युवकांना इराकमधील दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या संपर्कात आणले गेल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर या घटनेची पाळेमुळे अगदी पनवेलपर्यंत पोहोचल्याचे राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. पनवेलमधील एका तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्याची दोनदा चौकशी करण्यात आली. मात्र या प्राचार्याचा अद्याप थेट संबंध स्पष्ट झालेला नसला तरी कथित दोघा अफगाणी नागरिकांना आश्रय दिला असावा, असा संशय आहे. कल्याण तसेच आसपासच्या परिसरात दोन गट कार्यरत असल्याची माहितीही चौकशीत उघड झाली आहे. कल्याणमधील चार युवक अचानक बेपत्ता झाले आणि ते इराकमधील ‘इसिस’च्या कळपात गेले असावे, असा संशय आहे. यापैकी एका तरुणाचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. उर्वरित तीन तरुण आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कातही होते. त्यापैकी एकाने आम्ही भारतात परतणार आहोत, असेही सांगितले होते. परंतु आता हे तरुण संपर्कात नाहीत. त्यामुळे त्यांचे काय झाले असावे, अशी भीती कुटुंबीयांना वाटत आहे. याप्रकरणी एटीएसने रेहमान दौलती आणि अहमद रातेब हुसैनजादे या दोघा अफगाणी नागरिकांवर संशय व्यक्त केला होता. हे दोघेही व्यवसायाच्या निमित्ताने भारतात आले असले, तरी त्यांचा प्रत्यक्षात हेतू वेगळा होता, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. यापैकी एका अफगाणी नागरिकाने १७ वर्षीय भारतीय तरुणीशी विवाहही केला. तिला घेऊन तो अफगाणिस्तानातही गेल्याची माहिती उघड झाली. राज्याच्या एटीएसला हे सारेच धक्कादायक वाटत असून कुठपर्यंत या प्रकाराची पाळेमुळे पसरली आहेत, याचा सध्या शोध घेतला जात असल्याचे एटीएसमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अत्यंत गोपनीय पद्धतीने अफगाणी नागरिकांनी चार तरुणांना भडकावले हे खरे असले, तरी असे आणखी काही तरुणही त्यांच्या संपर्कात असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीवरून एटीएसने अशा काही संशयित तरुणांची चौकशी केल्याचेही वृत्त आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यास सूत्रांनी नकार दिला. हा तपास अत्यंत संवेदनाक्षम असल्यामुळे निष्कर्ष निघाल्याशिवाय काहीही सांगणे योग्य होणार नाही, याकडेही या सूत्रांनी लक्ष वेधले.

संबंधित चार तरुण आयसिसच्या संपर्कात आहेत किंवा नाही, याबाबत आमच्याकडे पुरावा नाही. त्यामुळे या तरुणांना भारतात परत यायचे असले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. या तरुणांवर कोणतेही गुन्हे दाखल नसल्यामुळे लूक आऊट वा रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली नाही. हे तरुण परतल्यास त्यांचा जबाब घेतला जाईल. आयसिसच्या संपर्कासाठी त्यांना कोणी मार्गदर्शन केले याची माहिती काढली जाईल.
एक वरिष्ठ अधिकारी, एटीएस