मोबाईल वापरण्याचे ‘आधुनिक पथ्य’

महागडे मोबाईल चोरीला गेले की ते आयएमईआय क्रमांकावरून शोधता येत असत. परंतु हे आयएमईआय क्रमांकच नष्ट करून हे मोबाईल पुन्हा वापरात आणण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत.

महागडे मोबाईल चोरीला गेले की ते आयएमईआय क्रमांकावरून शोधता येत असत. परंतु हे आयएमईआय क्रमांकच नष्ट करून हे मोबाईल पुन्हा वापरात आणण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. मुबंई पोलिसांनी अशा एका टोळीला गजाआड केले आहे. यातील मुख्य आरोपी संगणकातील पदवीधर आहे. पण या निमित्ताने मोबाईल वापरण्याचे ‘आधुनिक पथ्य’ लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.मोबाईल अणि त्यातही स्मार्ट फोन ही प्रत्येकाची गरज झाली आहे. या मोबाईलच्या सुरक्षेसाठी त्यात एक आयएमईआय क्रमांक असतो. तो एकप्रकारे मोबाईलचा डीएनए असतो. त्यामुळे अन्य कुणीही त्यात सीम कार्ड टाकून वापरले की लगेच त्याची माहिती मिळू शकते. त्यामुळे मोबाईल ग्राहक निश्चिंत असायचे. परंतु आता विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने आधीचा आयएमईआय क्रमांक नष्ट करून त्यावर दुसऱ्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक टाकणे शक्य होऊ लागले आहे. चोरीला गेलेल्या महागडय़ा मोबाईल फोनचा आयएमईआय क्रमांक नष्ट करून त्यात दुसरा क्रमांक टाकून तो विकला जात असे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ८ चे प्रमुख दीपक फटांगरे यांच्या पथकाने मालाड येथे सापळा लावून समीर भयानी (४७) याला अटक केली. त्याच्याकडून चोरून आणलेले आणि आयएमईआय क्रमांक बदललेले ७ मोबाईल जप्त करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार बोरिवलीच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरवर छापा घालून मोबाईल विक्रेते अशोक संत आणि तुषार रजपूत यांना अटक करण्यात करण्यात आली. त्यांच्याकडून हार्ड डिस्क, आयएमईआय क्रमांक बदलणारे सॉफ्टवेअर, दुसऱ्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक, लेबल्स आदी जप्त करण्यात आले. तसेच सुमारे सव्वाशे चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले.
असा बदलतो आयएमईआय.
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण १) अंबादास पोटे यांनी सांगितले की, आरोपी भयानी हा चोरीचे मोबाईल विकत घेऊन अशोक संत आणि तुषार रजपूत यांना देत असे. तुषार हा संगणक अभ्यासक्रमातील पदवीधर आहे. तो या चोरून आणलेल्या मोबाईलमधील आयएमईआय क्रमांक सॉफ्टवेअरच्या मदतीने नष्ट करून साध्या मोबाईलचा दुसरा आयएमईआय क्रमांक त्यावर टाकत असे. त्यामुळे या मोबाईलची ओळख पुसली जायची. हे फोन नंतर नवीन लेबल लावून अन्य ग्राहकांना विकले जात असे.चिनी बनावटीचे फोन हजार ते पंधराशे रुपयांना मिळतात. स्मार्ट फोन १५ हजार रुपयांपासून सुरू होतात. ही टोळी चिनी मोबाईलचे आयएमईआय क्रमांक या चोरून आणलेल्या फोनमध्ये टाकत असे. त्यासाठी १०० रुपये आणि चिनी फोनचे हजार रुपये असा अकराशे ते पंधराशे रुपये त्यासाठी खर्च यायचा. यामुळे चोरलेल्या मोबाईलचा कधीच शोध लागत नसे, असे फटांगरे यांनी सांगितले. पोलिसांनी जरी एक टोळी पकडली असली तरी मुंबईत अनेक ठिकाणी अवघ्या शंभर रुपयात आयएमईआय क्रमांक बदलून देणारे अनेकजण आहेत. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे तीन हजारांहून अधिक मोबाईल चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. केवळ आयएमईआय क्रमांकच नव्हे तर मोबाईल क्रॅकर सॉफ्टवेअरही नष्ट केले जात आहेत.  
काय काळजी घ्याल
प्रवासात, गर्दीच्या ठिकाणी, लोकलमध्ये, अगदी चालत असतानाही मोबाईल पळवले जातात. मोबाईल गेल्याने खिशाला खड्डा तर पडतोच; पण त्याहीपेक्षा त्यातील डेटा गेल्याने जणू अपंगत्वच येते. त्यामुळे मोबाईल वापरताना विशेष खबरदारी घ्यावी. मोबाईलमध्ये कुठलीही व्यक्तिगत माहिती अथवा छायाचित्रे ठेऊ नये. फेसबुक, ई मेल पासर्वड टाकून सुरक्षित करावेत. बँकेचे पासवर्ड्स आणि अन्य माहिती साठवू नये. मोबाईल क्रमांक आणि माहितीचा त्वरीत बॅकअप घेऊन ठेवावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Modern way to use mobile

ताज्या बातम्या