बैठे काम व त्यामुळे परिश्रम होत नसल्याने विविध कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये विविध आजार बळावत आहेत. आजार होऊ नये व स्फूर्ती राहावी यासाठी अजनी येथील जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी आठवडय़ातून किमान दोन दिवस सायकलने कार्यालयात ये-जा करण्याच ठरवले. त्याला आता उत्तम प्रतिसाद मिळत असून आता वरिष्ठ अधिकारीही आवर्जून  सायकलनेच येत आहेत. या कर्मचाऱ्यांचा हा आदर्श अन्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजच्या दगदगीच्या काळात व्यायामाची सवय कमी होत आहे व त्यामुळे आजारही वाढत आहेत. आठवडय़ातून किमान दोन दिवस सायकलने घरून कार्यालयात ये-जा केल्यास अनेक आजारांना आळा बसू शकतो, असा विचार जलविज्ञान प्रकल्प विभागातील शाखा अभियंता एन. झेड. बैसवारे यांच्या मनात आला. त्यांनी काही कर्मचाऱ्यांशी सल्लामसलत करून ४ नोव्हेंबर २०१३ रोजी ‘जलसंपदा विभाग सायकल क्लब’ ची स्थापना केली. चारशे कर्मचारी असलेल्या या कार्यालयातील फक्त मोजकेच कर्मचारी सुरुवातीला या क्लबचे सदस्य झाले. काही कर्मचारी तर या क्लबला दूषणेही देत होते, परंतु या क्लबच्या सदस्यांनी टीकेकडे लक्ष न देता आठवडय़ातील सोमवार आणि शुक्रवारी कार्यालयात येण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला दहा-पंधराच कर्मचारी सायकलने येत होते. यातही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचेच प्रमाण अधिक होते. सायकलने येणाऱ्यांची थट्टा होऊ लागली, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यावर हळूहळू थट्टा करणारेही या क्लबचे सदस्य होऊ लागले. पहाता पहाता चारशे कर्मचाऱ्यांपैकी आता तब्बल शंभर कर्मचारी या क्लबचे सदस्य झाले आहेत. यात महिलाही आहेत, हे विशेष. सायकलिंगमुळे होणारे फायदे एकमेकांना सांगत ही संख्या वाढत आहे. दर महिन्याला कुणी ना कुणी कर्मचारी नवीन सायकल खरेदी करत आहे. सव्वा वर्षांत खूप मजल गाठली आहे. पुढील वर्षांपर्यंत एकूण ५० टक्के कर्मचारी सायकलने घरून कार्यालयात ये-जा करतील, अशी अपेक्षाही बैसवारे यांनी व्यक्त केली.
हे कर्मचारी एवढय़ावरच थांबले नाहीत, तर शहरातील विविध संस्थांतर्फे घेण्यात येणाऱ्या सायकल स्पर्धामध्येही ते आवर्जून सहभागी होतात. प्रत्येक महिन्यातील एका रविवारी २५ ते ३० कि.मी. दूर अंतरावरील प्रेक्षणीय स्थळी जाण्याचा क्लब विचार करत आहे. काहीतरी वेगळे करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा आदर्श इतर कार्यालयातील कर्मचारी निश्चित घेतील, अशी अपेक्षा या क्लबला आहे.
चालणे आणि सायकलिंग हे रोजच्या जीवनात व्यायामशाळेतील व्यायामपेक्षा जास्त फायदेशीर आहे. पोहण्याइतकाच तो सर्वागीण व्यायाम आहे. सायकलिंग हा श्रेष्ठ व्यायाम असून त्याला विशेष वेळ देण्याची गरजही नसते, असेही बैसवारे म्हणाले.