म्हणे दिरंगाईबद्दल आम्ही दिलगीर आहोत..

ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या मध्य रेल्वेमार्गावरील बिघाडांमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांच्या संतापाचा पारा बुधवारी डोंबिवली स्थानकात फुटला आणि महिला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे ‘रेल रोको’ करत मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा विरोध केला. मध्य रेल्वेमार्गावर दर दिवशीच काही ना काही कारणांमुळे उपनगरीय गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडत आहे. यासाठी रेल्वेकडून विविध कारणेही दिली जात आहेत. मात्र या विविध कारणांमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.

ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या मध्य रेल्वेमार्गावरील बिघाडांमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांच्या संतापाचा पारा बुधवारी डोंबिवली स्थानकात फुटला आणि महिला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे ‘रेल रोको’ करत मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा विरोध केला. मध्य रेल्वेमार्गावर दर दिवशीच काही ना काही कारणांमुळे उपनगरीय गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडत आहे. यासाठी रेल्वेकडून विविध कारणेही दिली जात आहेत. मात्र या विविध कारणांमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. मात्र, मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडत आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मात्र पावसाळ्यानंतर आम्ही कल्याण यार्डमध्ये काही महत्त्वाची कामे करत आहोत. येथील रेल्वेरूळ बदलणे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता गरजेचे आहे. या कामामुळेच कल्याण ते दिवा या टप्प्यातील वाहतूक दिरंगाईने सुरू असते, असे सांगत आम्ही दिलगीर आहोत, अशी हतबल प्रतिक्रिया मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

उशीर नेहमीचाच, कारणे नवी!
मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांची अवस्था ‘रोज ‘मरे’ त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. या मार्गावर पाच-सात मिनिटांची दिरंगाई फार मोठी मानली जात नाही. किंबहूना पाच मिनिटांच्या दिरंगाईची नोंद रेल्वेच्या लेखीही केली जात नाही. त्यामुळे ट्रान्स हार्बर, हार्बर आणि मुख्य मार्ग मिळून १६८० सेवा चालवणारी मध्य रेल्वे सतत उशिरानेच धावत असते. मात्र हा उशीर होण्यासाठीची कारणे मात्र दर दिवशी नवनवीन असतात. या कारणांमध्ये तांत्रिक बिघाडांपासून अगदी प्रवासी किंवा स्थानिक लोकांशी संबंधित कारणांचाही समावेश असते.

प्रमुख कारणे
ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, पेंटोग्राफमध्ये बिघाड, लोकलच्या डब्यात बिघाड, सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वेरूळाला तडा, रेल्वेरूळात बिघाड, रेल्वे फाटक जास्त काळ उघडे राहणे, रेल्वे फाटकाजवळ स्थानिकांनी जबरदस्ती करणे, रेल्वेरूळाखालून जाणाऱ्या वायर्समध्ये शॉर्ट सर्किट होणे, प्रवाशांनी साखळी खेचल्याने गाडी थांबणे, गाडी रूळावरून घसरणे.

गाडय़ा घसरणे नित्याचेच
रेल्वेच्या परिचालनामध्ये गाडी रूळावरून घसरणे ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट मानली जाते. गाडी रूळावरून घसरणे म्हणजे रेल्वेचा कारभार अत्यंत सामान्य पातळीवर आल्याचे लक्षण आहे. मात्र मध्य रेल्वेमार्गावर ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबर या तीन महिन्यांत आठ वेळा गाडय़ा रूळावरून घसरल्या आहेत. सुदैवाने या एकाही घटनेत जीवितहानी झाली नाही. प्रत्येक घटनेनंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले होते.

दिवा स्थानकाजवळील फाटक
मध्य रेल्वेच्या दिरंगाईसाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार दिवा स्थानकाजवळी फाटकाचे कारण पुढे केले जाते. गेल्या काही वर्षांत दिवा येथील लोकवस्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. नवनव्या इमारतींमुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूला खासगी वाहनांतून जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. येथे उड्डाणपुल होणे गरजेचे असूनही ठाणे महापालिका व रेल्वे या दोहोंकडून या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे गर्दीच्या वेळेतच फाटक चार मिनिटांऐवजी आठ ते दहा मिनिटे उघडे राहते. परिणामी दर दिवशी ४०-४५ सेवांवर त्याचा परिणाम होतो.

नव्या वेळापत्रकाची भर
गेल्या काही वर्षांत मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात लक्षणीय बदल झाले नव्हते. काही ठरावीक गाडय़ांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. मात्र यंदा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर १५ नोव्हेंबरपासून लागू केलेल्या नव्या वेळापत्रकात सर्वच गाडय़ांच्या वेळा बदलल्या आहेत. नव्या वेळापत्रकात एकाही नव्या गाडीची भर नसताना सर्व गाडय़ांच्या वेळा पुढेमागे केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तसेच नवे वेळापत्रक अमलात आल्यापासून जवळपास दर दिवस या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनात या नव्या वेळापत्रकाबाबतही असंतोष आहे. वेळापत्रकातील अनेक गाडय़ा रद्द करून त्याबाबतची उद्घोषणा न करण्याच्या प्रकारामुळेच बुधवारी डोंबिवलीतील महिला प्रवासी रेल्वेरूळांवर उतरल्या आणि त्यांनी रेल्वेसेवा काही वेळासाठी बंद केली.

सहनशक्तीचा अंत
मध्य रेल्वे प्रशासनाचा कारभार अत्यंत हलगर्जीपणाचा आहे. मुंबई उपनगरीय विभागात वारंवार होणाऱ्या बिघाडांचे उत्तरदायित्त्व निश्चित करून बडय़ा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ऐन गर्दीच्या वेळी गाडय़ा रद्द केल्या जातात, उशिराने धावणाऱ्या गाडय़ांबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण असते. मुंबईतील प्रवासी पोटापाण्यासाठी रेल्वेवर अवलंबून आहे. आमच्याकडे डोंबिवलीहून दिव्याला येण्यासाठीही पर्यायी व्यवस्था नाही. ती तयार व्हायला हवी. तसेच रेल्वेचा कारभार सुधारणे आवश्यक आहे. अन्यथा डोंबिवलीच्या घटनेप्रमाणे प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत होईल.

वेळापत्रकात बदल संघटनांशी विचार करूनच व्हायला हवा
उपनगरीय रेल्वेसेवेच्या वेळापत्रकाचा थेट परिणाम ४५ लाख प्रवाशांच्या आयुष्यावर होत असतो. हे प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या आमच्यासारख्या रेल्वे प्रवासी संघटनांना विश्वासात घेऊनच वेळापत्रकाती बदल व्हायला हवेत. तसेच वेळापत्रक बदलताना प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांचाही विचार झाला पाहिजे. नव्या वेळापत्रकात कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांवर अन्याय केला आहे. तसेच एकही जादा गाडी सोडलेली नाही.
नंदकुमार देशमुख.
अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे
प्रवासी एकता महासंघ

दिलगीर आहोत..
मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडत आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मात्र पावसाळ्यानंतर आम्ही कल्याण यार्डमध्ये काही महत्त्वाची कामे करत आहोत. येथील रेल्वेरूळ बदलणे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता गरजेचे आहे. या कामामुळेच कल्याण ते दिवा या टप्प्यातील वाहतूक दिरंगाईने सुरू असते. त्याचा परिणाम अन्यत्र होत आहे. नव्या वेळापत्रकाबद्दल मात्र आमचाही नाईलाज आहे. आमच्याकडे सेवा वाढवण्यासाठी पुरेशा गाडय़ा उपलब्ध नाहीत. या गाडय़ा आल्या, तरीही पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण होईपर्यंत जास्त सेवा वाढवता येणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तरीही आम्ही काही छोटय़ा अंतरावरील गाडय़ा बदलापूर किंवा कल्याणपर्यंत वाढवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुकेश निगम
विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई.

तांत्रिक बिघाड..
* ११ ऑगस्ट – मध्य रेल्वेवर आटगाव-आसनगाव स्थानकांदरम्यान लोकल गाडीच्या डब्यात तांत्रिक बिघाड. हार्बर मार्गावर मस्जिद-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमधील बिघाड.
* १२ ऑगस्ट – हार्बर मार्गावर मशीद-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिसन स्थानकांदरम्यान त्याच ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटली. १० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचा फटका बसल्याची चर्चा.
* २६ ऑगस्ट – मध्य रेल्वेवर माटुंगा आणि शीव स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड. पश्चिम रेल्वेवर सकाळी माहीमजवळ गाडीत तांत्रिक बिघाड. संध्याकाळी ग्रँटरोड आणि चर्निरोड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड.
* १ सप्टेंबर – पश्चिम रेल्वेवर मोटरमनने लाल सिग्नल मोडल्याने गाडी काही काळ खोळंबली.
* २ सप्टेंबर – विक्रोळी-घाटकोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.
* २६ सप्टेंबर – भायखळ्याजवळ रेल्वेच्या डब्यात तांत्रिक बिघाड
* १ ऑक्टोबर – ट्रान्स हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड
’ २३ ऑक्टोबर – भांडूप स्थानकात ऐन दिवाळीच्या दिवशी लोकलच्या डब्यातून धूर
* ३१ ऑक्टोबर – भिवपूरी रोड आणि कर्जत यांदरम्यान गाडीचा पेंटोग्राफ आणि ओव्हरहेड वायर यांच्यात बिघाड.
* ४ नोव्हेंबर – सीएसटी यार्ड परिसरात पुष्पक एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड.
* ११ नोव्हेंबर – दादर स्थानकात रेल्वे रूळांदरम्यान बिघाड.
* १४ नोव्हेंबर – पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत.
* १७ नोव्हेंबर – आटगाव स्थानकाजवळील रेल्वे फाटक आठ मिनिटे उघडे राहिल्याने व लोकल डब्यात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत.

गाडी घसरली
* लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकाजवळ पाचव्या मार्गावरून घसरली.
* १४ सप्टेंबर – सीएसटीवर हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक एकजवळ लोकल घसरली.
* २४ सप्टेंबर – पंजाब मेल सीएसटी ते मशीददरम्यान यार्डमध्ये जाताना घसरली.
* ३० सप्टेंबर – डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरले.
* ३ ऑक्टोबर – कल्याण स्थानकात लोकलचे डबे घसरले.
* ३० ऑक्टोबर – कल्याण स्थानकात अमरावती एक्सप्रेसचे डबे घसरले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Passengers are angry due to mess up on central railway in mumbai

ताज्या बातम्या