डबक्यांची मुंबई

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजना राज्यातील दुष्काळी भागात अजूनही योग्यरीत्या अवलंबली जात नसली तरी मुंबईच्या रस्त्यांवरील हजारो खड्डेयुक्त तळ्यांमधून ती साकारली जात आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजना राज्यातील दुष्काळी भागात अजूनही योग्यरीत्या अवलंबली जात नसली तरी मुंबईच्या रस्त्यांवरील हजारो खड्डेयुक्त तळ्यांमधून ती साकारली जात आहे. मान्सूनच्या पहिल्याच टप्प्यातील पावसात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून जूनअखेरीस त्यांचा आकडा १३०० वर पोहोचला. पावसाचा जोर ओसरल्याने आणि आयुक्तांकडून तंबी मिळाल्याने कंत्राटदारांकडून वेगाने खड्डे भरले जात असले तरीही नव्याने निर्माण होत असलेल्या खड्डय़ांमुळे मुंबईकरांचा प्रवास त्रासाचा ठरत आहे.
मुसळधार पाऊस व वाहनांची संख्या यामुळे दरवर्षी मुंबईकरांना खड्डय़ांचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांचे काम उत्तम केल्याचा पालिकेचा दावा प्रत्येक पावसाळ्यात वाहून जातो. त्यातच २०१३ मध्ये खड्डय़ांवरून प्रचंड मानहानी सहन कराव्या लागलेल्या पालिकेने गेल्या वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गेल्या वर्षी मुंबईकर काही प्रमाणात सुदैवी ठरले. या वर्षी मात्र ही तरतूद ११ कोटींनी कमी करण्यात आली. रस्ते चांगले असल्याने खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेकडून व्यक्त करण्यात आला. मात्र पहिल्याच पावसात पालिकेची गुळगुळीत रस्त्यांची आश्वासने वाहून गेली आहेत. मंगळवापर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर .. खड्डे पडल्याची नोंद आहे. त्यातील ८४२ खड्डे पालिकेने बुजवले आहेत. मात्र पाऊस थांबून आठवडाभर झाला असला तरी खड्डय़ांची संख्या दररोज वाढत आहे.
दहिसर, बोरीवली, कांदिवली, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व, सांताक्रूझ, कुलाबा या वॉर्डमध्ये सर्वाधिक खड्डय़ांची नोंद झाली आहे. नोंद न झालेल्या खड्डय़ांची संख्या किती तरी जास्त असू शकेल. आयुक्तांनी सांताक्रूझ व वांद्रे येथे रस्त्यांवरील खड्डय़ांची पाहणी केल्याने वॉर्ड पातळीवर अधिक वेगाने खड्डे दुरुस्ती सुरू आहे. मात्र खड्डे बुजवल्यानंतर रस्ते उंचसखल होत असल्याने पावसाळाभर प्रवाशांना उंटावरील प्रवासाचा अनुभव मिळेल.

पालिकेच्या अर्थसंकल्पातील सुमारे दहा टक्के रक्कम रस्ते सुधारण्यासाठी खर्च होते. २०१४-१५ या वर्षांत २,३०९ कोटी रुपये रस्त्यांवर खर्च करण्यात आले. या आर्थिक वर्षांसाठी तब्बल ३,२०० कोटी रुपये रस्त्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात ३१४ रस्ते सुधारण्यात आले तर ५७४ रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र तरीही मुंबईकर आणि खड्डे हे समीकरण सुटलेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Potholes in mumbai