शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकसेवक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याने माहिती अधिकारविषयी कामकाज करीत असताना त्यांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी येथील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत केले.
‘माहिती अधिकार अधिनियम २००५’ या विषयावर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार शशिकांत हदगल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड उपस्थित होते. आपले उत्तरदायित्व असते की जनतेला अपेक्षित माहिती वेळेवर उपलब्ध करून देणे. जनतेनेही मोजकी व गरजेची माहिती मागितल्यास शासकीय कामाचा अपव्यय टाळता येईल, अशी सूचना गायकवाड यांनी केली. माहिती अधिकाराचे राज्यस्तरावरून संगणकीकरण करण्यात येत असून प्रत्येक विभागाने आपले संकेतस्थळ सुरू करावे व त्यावर जनतेला अपेक्षित असलेली माहिती प्रसिद्ध केल्यास याचा नक्कीच फायदा होईल. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ विषयी जनप्रबोधन करण्याकरिता यशदाप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत जनतेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या.
उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी पाचोरा विभागांतर्गत महसूल यंत्रणेचे स्वतंत्र संकेतस्थळ लवकरच सुरू करण्यात येणार असून, माहिती अधिकार अधिनियम २००५ विषयीची संपूर्ण माहिती संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. बैठकीचे सूत्रसंचालन तहसीलदार शशिकांत हदगल यांनी केले. दरम्यान, गायकवाड यांनी मेहुणबारे येथील दिवान चव्हाण रोपवाटिकेला भेट देऊन दिवान मास्तर बालोद्यान कोनशिलेचे अनावरण केले. याप्रसंगी आमंत्रित ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. मेहुणबारे येथील अंगणवाडी केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराविषयीची माहिती घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2013 रोजी प्रकाशित
माहिती अधिकारविषयक कामासाठी मानसिकता बदलण्याची गरज
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकसेवक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याने माहिती अधिकारविषयी कामकाज करीत असताना त्यांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी येथील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत केले.
First published on: 22-02-2013 at 01:29 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Right to information work need to change mentality