समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांना द्यावयाच्या १ हजार ४७० सौरदिव्यांची खरेदी करताना अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवल्याचे स्पष्ट होताच जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मोठा गदारोळ झाला. चौकशीत ठपका ठेवलेल्या ३ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी जाहीर केले. सौरदिवे वर्षभर अंधारात होते. त्याचे वाटप झाले नाही, असा सदस्यांचा आक्षेप होता.
गेले वर्षभर खरेदी केलेले सौरदिवे लाभार्थ्यांना दिलेच नाहीत. या सर्व खरेदी प्रकरणात घोटाळा असल्याची तक्रार माजी सभापती राजेंद्र राठोड यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप देशमुख व वासुदेवराव साळुंखे यांची चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने तत्कालीन समाजकल्याण अधिकारी एन. सी. राठोड, जयश्री सोनकवडे, निरीक्षक िशदीकर यांची चौकशी केल्यानंतर अनियमितता आढळून आली. लाभार्थीची यादी न ठरल्याने वर्षभर सौरदिवे पडून राहिले. परिणामी योजनेचे मातेरे झाले. जि. प. च्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप सदस्य या प्रश्नी आक्रमक झाले. अनिल चोरडिया, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह सदस्यांनी हा प्रश्न लावून धरल्याने सभेत या प्रश्नी बराच गदारोळ झाला.