अडीच वर्षांत येथे दोन जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले. अडीच वर्षांत आता तिसरी व्यक्ती या पदावर येणार आहे. जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांची पुणे येथे अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी बदली झाली. त्यांना शनिवारी राजपत्रित कर्मचारी संघटना व  कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला.
१ सप्टेंबर २०१२ रोजी देशपांडे येथे रुजू झाले होते. त्यांच्या बदलीचा आदेश १६ जानेवारीला निघाला. त्यानुसार १ फेब्रुवारीपर्यंत काम केल्यावर नवीन ठिकाणी रुजू होण्याबाबत कळविले होते. बदलीचा आदेश निघूनही १५ दिवस जिल्हाधिकारीपदी त्यांना ठेवण्यामागे मतदारयादीच्या प्रसिद्धीचे कारण होते. १ जानेवारीच्या अर्हता दिनांकावर सुधारीत मतदारयादी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी पदातून कार्यमुक्त होण्यास ते मोकळे झाले. त्यांनी जेमतेम १ वर्ष ४ महिने येथे काम केले. तीव्र दुष्काळी स्थितीत काम केल्यानंतर वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण होत नाही, तोच अन्यत्र बदलीचे प्रयत्न देशपांडे यांनी सुरू केले होते. दरम्यान, त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. परंतु ही विनंती अमान्य करून सरकारने त्यांची पुणे येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर बदली केली.
देशपांडे यांच्यापूर्वी जिल्हाधिकारीपदी बदलून आलेल्या तुकाराम मुंडे यांचीही १ वर्ष ५ महिने झाल्यावर बदली झाली होती. मुंडे यांचे अनेक निर्णय व कार्यपद्धतीविषयी विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी तक्रारी करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यामुळे २२ जून २०११ रोजी रुजू झालेल्या मुंडे यांना ३१ ऑगस्ट २०१३पर्यंतच काम करता आले. लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे मुंडे यांची बदली झाली, तर देशपांडे यांनी स्वत:हून बदली करवून घेतली.
दरम्यान, गेल्या जूनमध्ये रिक्त झालेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदाचा अधिकचा कार्यभार निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्याकडे आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.