डोंबिवलीचा मानबिंदू म्हणून ओळखले जाणारे घरडा सर्कल येथील स्फूर्तिस्थळ, रणगाडा तसेच या परिसराच्या देखभालीसाठी विद्यानिकेतन शाळेने पुढाकार घेतला आहे. या शाळेच्या पुढाकारामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने या स्वरूपाचा प्रस्ताव तयार केला असून स्फूर्तिस्थळाची देखभाल यापुढे विद्यानिकेतन शाळेच्या व्यवस्थापनाने करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेचे विश्वस्त, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सहभागातून हा परिसर सुशोभित राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भाजपचे दिवंगत नगरसेवक नंदकिशोर जोशी यांच्या प्रयत्नातून डोंबिवली शहराच्या प्रवेशद्वारावर रणगाडा, शहीद लष्करी जवान तसेच अधिकाऱ्यांचे स्फूर्तिस्थळ उभारण्यात आले आहे. जोशी यांनी स्वत पुढाकार घेऊन या सर्व परिसराची देखभाल राखली जावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या निधनानंतर शहराचा मानिबदू असणाऱ्या या सर्व परिसराची वाताहत होऊ लागली आहे. योग्य देखभाल करण्यात येत नसल्याने या वास्तूची पडझड झाली आहे. या परिसराला प्रेमी युगुल, भिकारी, गर्दुल्ल्यांचा वेढा पडत असल्याचे चित्र आहे. रणगाडा, स्फूर्तिस्थळ, बाजूचे उद्यान यामध्ये विजेचे दिवे नाहीत. रणगाडय़ाची देखभाल तसेच रंगरंगोटी होत नसल्याने त्याला गंज चढला आहे. शहीद जवानांची काही तैलचित्रे खराब झाली आहेत. कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासाची भाषा करणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांनी स्फूर्तिस्थळाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. डोंबिवलीत नवनिर्माणाची भाषा करणाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश होता. विद्यानिकेतन शाळेच्या व्यवस्थापनाला मात्र स्फूर्तिस्थळाची ही दुर्दशा अस्वस्थ करत होती. विद्यानिकेतनचे प्रमुख विवेक पंडित यांनी मध्यंतरी महापालिका प्रशासनाला यासंबंधी पत्रव्यवहार केला. त्यामध्ये स्फूर्तिस्थळ, रणगाडा व परिसराची देखभाल करण्याची जबाबदारी उचलण्यास विद्यानिकेतन संस्था तयार असल्याचे म्हटले होते. शाळेच्या प्रस्तावानंतरही अनेक महिने हे धोरण लालफितीच्या कारभारात सापडले होते. उपमहापौर राहुल दामले यांनी अखेर यासंबंधी पुढाकार घेऊन स्फूर्तिस्थळाच्या देखभालीचा प्रश्न मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून यासंबंधीच्या प्रस्तावास महापालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी अलीकडेच पुढील चार वर्षांसाठी स्फूर्तिस्थळ परिसराची देखभाल करण्याचे पत्र शाळेच्या व्यवस्थापनाला दिले आहे.  
शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्या सहभागातून हा परिसर नियमित स्वच्छ, सुशोभित आणि देखणा ठेवण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात येणार आहे. या परिसरातील युगुल विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी प्रथम कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात या भागात विजेचे दिवे लावण्यात येणार आहेत. शहर परिसरातील नागरिक, शाळांमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनी या परिसराला भेटी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे विद्यानिकेतन संस्थेचे विवेक पंडित यांनी सांगितले.