जागतिक वारसा सप्ताहात पुरातत्त्व खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी ज्या पुरातत्त्व खात्याकडे आहे, त्या खात्यालाच त्यांची जबाबदारी डोईजड होत चालली आहे. जतनाच्या नावाखाली विकास थांबवायचा आणि जतनही करायचे नाही व विकासही होऊ द्यायचा नाही. ऐतिहासिक वारसा जतन करणारे खाते अस्तित्त्वात आहे, हे दाखवण्यासाठी केवळ उपचारापुरता वारसा सप्ताहानिमित्त एखादे प्रदर्शन आयोजित करायचे. पुरातत्त्व खात्याची ही भूमिका मात्र ऐतिहासिक वारसा जतन करण्याऐवजी वारसा धोक्यात टाकणारी आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या उत्खनन शाखेच्यावतीने इतिहासातील घटना जिवंत करणाऱ्या या शिलालेखांचे छायाचित्र, रेखाचित्रांचे प्रदर्शन जागतिक वारसा सप्ताहानिमित्त १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान खात्याच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. उत्खनन शाखा 3नागपूर आणि अरबी फारसी शिलालेख शाखा या आयोजनात सहभागी आहेत. दगडावर कोरलेल्या शिलालेखांच्या कागदावर घेतलेल्या सुमारे १५ हजार प्रतिकृती या शाखेकडे असून, त्यातील निवडक प्रतिकृती या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रदर्शनात पाऊल ठेवल्यानंतर खात्याच्या पदाधिकाऱ्यांची उदासिनता संभ्रमात टाकणारी आहे. पुरातत्त्व काय आहे, शिलालेख काय आहेत, त्यावर नेमके काय कोरलेले आहे हे सामान्य नागरिकांना ठाऊक नाही. या प्रदर्शनात पाऊल ठेवल्यानंतर खात्याची एकही व्यक्ती माहिती देण्यासाठी उपस्थित नव्हती. विचारणा केली तर एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार या खात्यात दिसून आला. वरिष्ठ अधिकारी आले आहेत, त्यामुळे बैठक सुरू आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. तुमच्यापैकी कुणीतरी माहिती सांगा असे म्हटल्यानंतर आम्हाला फारसे माहीत नाही. आमचे वरिष्ठच माहिती देतील, असे सांगून बोळवण करण्यात आली. तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरू होता. आताच तर उद्घाटन झाले, माहितीच हवी असेल तर ‘मेल आयडी’ द्या, आम्ही पाठवून देऊ. पुरातत्त्व खात्यातील कर्मचाऱ्यांच्या या उत्तरावर हसावे की रडावे, हेच कळत नव्हते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबतच जिथे असा व्यवहार होत असेल, तिथे सामान्य नागरिकांना काय उत्तरे दिली जात असतील, याचा विचारही करणे कठीण आहे.