अमेरिका ही विमानांची जन्मभूमी, त्यामुळे तेथे हवाई धुरंधरांची (एव्हिएटर) परंपराही मोठी. या परंपरेतील एक मोठे नाव म्हणजे चार्ल्स एलवुड तथा चक येगर. स्वनातीत म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने विमान उडवणारे ते पहिले वैमानिक. येगर अत्यंत निष्णात वैमानिक होते आणि त्याबरोबरीने उत्तम मार्गदर्शकही होते. वैमानिकांच्या अनेक पिढय़ा त्यांनी घडवल्या. प्रचलित संकेतानुसार इतका उत्कृष्ट वैमानिक अमेरिकेमध्ये आपसूकच अंतराळवीर होण्याच्या योग्यतेचा असतो. परंतु पदवी नसल्यामुळे त्यांना अंतराळवीर होण्याची संधी मिळाली नाही. रूढार्थाने त्यांना वैमानिकाचे प्रशिक्षणही मिळाले नव्हते. दुसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर ते लष्करात भरती झाले, एक जुळारी (मेकॅनिक) म्हणून. त्यांची नियुक्ती झाली त्या तळांवर लष्करी विमानांची देखभाल-दुरुस्ती केली जायची. लढाऊ विमानांशी इतक्या जवळून झालेला परिचय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

त्या वेळी म्हणजे दुसरे महायुद्ध ऐन भरात असताना, अमेरिकेला लढाऊ वैमानिकांची उणीव भासत होती. त्यावर मात करण्यासाठी प्रसंगी नियमांना बगल देऊन वैमानिकांची भरती आवश्यक बनली. चक यांच्या घरी कोणीच लष्करातील नव्हते. त्यांचे वडील शेतकरी होते. चक शाळेत अभ्यासापेक्षा बास्केटबॉल आणि अमेरिकी फुटबॉल यांसारख्या खेळांत अधिक रमत. मात्र भूमिती या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले होते. शिवाय ६०० यार्डावरील सावज अचूक टिपण्याचे शिकारी कौशल्यही त्यांच्यापाशी होते. दिशा आणि मितीविषयी ज्ञान त्यांना वैमानिक म्हणून घडवण्यात मोलाचे ठरले. त्यामुळे पदवी नसूनही या हरहुन्नरी जुळारीची तातडीच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड होऊ शकली. सप्टेंबर १९४१ मध्ये ते अमेरिकी लष्करात दाखल झाले होते, तर नोव्हेंबर १९४३ मध्ये वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करून ते इंग्लंडमधील युद्धभूमीकडे रवानाही झाले! युद्धातही एकदा ते उडवत असलेल्या पी-५१ मस्टँग स्क्वाड्रनने एका दिवसात पाच जर्मन मेसरश्मिट लढाऊ विमाने पाडून दाखवली.

युद्धानंतर चक यांना कॅप्टन या हुद्दय़ावर बढती मिळाली आणि ते चाचणी वैमानिक म्हणून काम पाहू लागले. उच्च वेगाच्या विमान उड्डाणांसाठी त्यांची निवड झाली. १४ ऑक्टोबर १९४७ रोजी त्यांनी एक्स-१ या विमानातून ध्वनीची वेगमर्यादा भेदून दाखवली. १९५०-१९५३ या काळात ते कोरियन युद्धात सहभागी झाले होते, त्या वेळी आणखी एक अमेरिकी वैमानिक स्कॉट क्रॉसफील्ड यांनी ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने (माक २) उड्डाण केले होते. ते गप्प बसणारे नव्हतेच. युद्धकर्तव्यावरून परतल्यानंतर चक यांनी त्यापेक्षाही अधिक वेगाने (माक २.४४) विमान उडवलेच. युरी गागारिन, नील आर्मस्ट्राँग, चार्ल्स लिंडबर्ग यांच्या तोडीचे वैमानिक असूनही तुलनेने या तिघांपेक्षा कमी प्रसिद्धी चक येगर यांच्या वाटय़ाला आली. पुढे ब्रिगेडियर जनरल या हुद्दय़ापर्यंत ते पोहोचले आणि चाचणी वैमानिकांच्या संस्थेचे प्रमुख बनले. तेथे त्यांनी अनेक वैमानिक आणि अंतराळवीर घडवले. ‘‘आपण हवाई कसरती किंवा मोहिमा केल्या, त्या प्रत्येक उड्डाणावेळी मृत्यूची जाणीव ठसठशीत होती,’’ असे ते मोकळेपणाने कबूल करीत. ९७ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांच्या वाटय़ाला आले. त्यांची कीर्ती त्यापेक्षा किती तरी अधिक वर्षे जिवंत राहील.