‘गणेश’, ‘शिव’, ‘देवी’, ‘विष्णू’, ‘महाभारत स्टोरीज- १२ पुस्तकांचा संच’ आदी पुस्तके इंग्रजीत, किशोरवयीन मुला-मुलींसाठी लिहिणाऱ्या सुभद्रा सेनगुप्ता यांना २०१४ सालासाठीचा, २०१५ मध्ये जाहीर झालेला ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’- तोही बालसाहित्य क्षेत्रामधील त्यांच्या एकंदर योगदानासाठी- मिळाला होता, हे वाचताच काही जणांना कसले-कसले राजकीय वास येऊ लागतील… ‘बघा, या लेखिकेला काँग्रेसींनी उपेक्षितच ठेवले’ किंवा ‘असल्या लेखिकेला बरोब्बर २०१४ नंतरच मिळणार पुरस्कार’ अशा दोन्ही टोकांच्या प्रतिक्रियाही येतील! पण हे राजकीय वास व टोकाच्या प्रतिक्रिया टाळायच्या, तर खरोखरच सुभद्रा यांचे एकंदर योगदान पाहावे लागेल. त्यासाठी निमित्त कोणतेही चालेल- अगदी, ‘३ मेच्या मध्यरात्री त्यांचा कोविडने मृत्यू झाला’ यासारखे दु:खद निमित्तसुद्धा.

आजची मुले, त्यांच्या पालकांनी कल्पनाही केली नव्हती अशी साधने लीलया हाताळतात; ही मुले वर्तमानकाळात आणि भविष्यातच जगतात. पालकही मुलांच्या भवितव्याचाच विचार करून (परदेशी शिक्षण वगैरेसाठी) मोठी बचत करत असतात… आणि ‘शेणाने शरीरातले विषाणू शोषले जातात’ असे काही यूट्यूबवर ऐकून या मुलांना खरे वाटते, असे का? मोबाइलच्या नादात इतिहास आणि पुराणकथा आई/ बाबा/  आजी/ आजोबांकडून ऐकल्याच नसल्याने या बहुतेक मुलांनी, ऐकताऐकता प्रश्न विचारलेलेच नसतात हे एक उत्तर! ते सुभद्रा यांनी हेरले आणि मुली-मुलांना जे प्रश्न पडायला हवेत, ते गृहीत धरून त्यांची उत्तरे ज्यातून मिळू शकतील अशा प्रकारे लेखन केले- मग पुस्तक गणपतीविषयी असो की महादेवांविषयी की गांधींविषयी, नर्मदा बचाओ आंदोलनाविषयी असो की भारतीय राज्यघटनेविषयी. आपल्या कथनात मुलांचे प्रश्न ओळखण्याची शक्ती असायला हवी, हे पथ्य त्यांनी पाळले! राज्यघटनेची ओळख करून देण्याबरोबरच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासही मुलांसाठी लिहिला आणि ‘अननोन इंडियन्स- पीपल हू क्वाएटली चेंज्ड द वर्ल्ड’ यासारखे पुस्तकही लिहिले. इतिहासातील सामान्यजन कसे राहात होते, काय खात होते, त्यांचे कपडे कसे असत आणि त्या वेळची मुले काय खेळत,  हेही तीन पुस्तकांतून शोधले! जोधपूरला तलावांद्वारे पाणी मिळवून देणारा राव जोध, वने संरक्षित करणारा सम्राट अशोक, वृक्षप्रेमी गुरुदेव टागोर आणि पर्यावरणनिष्ठ भारतीय विचार मांडणारे गांधीजी, तसेच नर्मदा, चिपको, सायलेंट व्हॅली आणि गंगा स्वच्छता या चळवळींवर चित्रमय (चित्रकार- तपस गुहा) पुस्तके लिहून त्यांनी पर्यावरणवाद ‘आपला’ कसा, याचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवला. महाभारताच्या मूळ संहितेवर अजिबात अन्याय न करता, ‘पुनर्लेखन म्हणजे लबाडी नव्हे’ हे पथ्य पाळून त्यांनी बारा लघुपुस्तके लिहिली. ‘फॉक्सी फोर’ आणि ‘मोस्टली घोस्टली’ यांसारख्या पुस्तकांतून मुलांना असणारे भुताखेतांचे आकर्षण आणि भूत खरे नसते ना, हे जाणण्याची- पुढल्या निकोप मनासाठी उपयोगी पडणारी- ईर्षा यांना सुभद्रा यांनी योग्य वळण दिले. रोजनिशी हा प्रकार (जेफ किनेचे ‘विम्पी किड’ गाजल्यानंतर) हाताळून त्यांनी ‘सीक्रेट डायरी ऑफ…’ या मालिकेत ‘वस्र्ट कुक’ आणि ‘वस्र्ट फ्रेंड’ अशी दोन पुस्तके, तर ‘टीनएज डायरी ऑफ…’ या मालिकेत जहाँआरा आणि जोधबाई यांच्या बालिकावस्थेविषयीची पुस्तके लिहिली होती. ‘टीनएज डायरी…’ मालिकेतील, तसेच ‘महल’पासून सुरू झालेली जरा मोठ्या तरुणांसाठीची पुस्तके आणखी येण्याआधीच त्या गेल्या.