कुलवंतसिंग कोहली

ते कुंदनलाल सगलना मान्यता मिळवून देणारे होते.. ते मधुबाला व राज कपूर यांना हिंदी चित्रपटात पहिल्यांदा नायक-नायिका होण्याची संधी देणारे होते.. ते गीता बाली, तनुजासारख्या अनेक हिरेमाणकांची कारकीर्द घडवणारे होते.. ते खुद्द भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या निमंत्रणावरून ‘चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ची उभारणी करणारे द्रष्टे होते.. आणि ते होते- केदार शर्मा!

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

केदारजी कोणातही मिसळत नसत. आपण बरं, आपलं काम बरं असा त्यांचा स्वभाव. पण माझ्या पापाजींचे ते खास मित्र होते. ते फार क्वचित मद्यपान करत; परंतु पापाजींबरोबर त्यांची मफल जमे आणि अर्थात माझ्याबरोबरही! खरे तर ते माझ्याहून कितीतरी ज्येष्ठ होते. साधारणपणे ते २३ वर्षांनी मोठे होते. त्यामुळे ते माझ्यावर मुलासारखं प्रेम करायचे आणि कित्येकदा मनातली गुजंही सांगायचे. मी त्यांना पापाजीच म्हणत असे.

केदारपापाजींकडे एक छोटीशी कार होती. ती ते स्वत: चालवायचे; त्यांनी चालक ठेवला नव्हता. ते बऱ्याचदा ‘प्रीतम’च्या बाहेर कारमध्येच थांबायचे, हॉर्न वाजवायचे; मी किंवा पापाजी, जो कोणी काऊंटरवर असे तो कारकडे जाई आणि केदारजींची ऑर्डर घेई. एखाद्या संध्याकाळी उशिराने ते रेस्टॉरंटमध्ये, आत आले तर त्यांची एक ठरावीक जागा असे त्या जागेवर बसत. मग पापाजी त्यांच्याजवळ जाऊन बसत. दोघेही आरामात गप्पा मारत मद्यपान करत. केदारजी फारसे कोणाशी बोलत नाहीत हे पापाजींना ठाऊक होते. त्यामुळे ते सावधपणेच त्यांच्याशी बोलत. एकदा काऊंटरवर मी होतो. केदारजींची कार समोर येऊन उभी राहिली. परंतु नेहमीप्रमाणे हॉर्न वाजला नाही. म्हणून मी कारजवळ गेलो. नेहमीप्रमाणे केदारजी चालकाच्या जागेवर होते, पण त्यांचे हात व डोके त्यांनी ड्रायव्हिंग व्हीलवर ठेवले होते. मी त्यांना हळूच हाक मारली, ‘‘पापाजी.’’ त्यांनी उत्तर दिलं नाही. मी तिसऱ्यांदा हाक दिल्यावर थोडंसं दचकूनच त्यांनी मान वर केली. त्यांचे डोळे लाल झाले होते, नाक चोंदलं होतं, गळा भरलेला होता. अंगात स्वेटर होते. त्यांनी कशीबशी ऑर्डर दिली. मी त्यांना विचारलं, ‘‘तब्येत बरी नाही का?’’ त्यांनी होकारार्थी मान हलवली. ‘‘मग कोणाला बरोबर का घेतलं नाही?’’ ते कसंनुसं हसले. त्या ऑर्डरसोबत मी त्यांना पाया सूप दिलं. त्यांना हळूच म्हणालो, ‘‘पापाजी, ड्रायव्हर सोबत घेत जा.’’ त्यांनी स्थिरपणे माझ्याकडे पाहून मान हलवली आणि शांतपणे निघून गेले.

काही दिवसांनी ते पुन्हा आले. यावेळी ते सरळ आत आले. काऊंटरवर मी एकटाच होतो. त्यांचे जोडीदार, म्हणजे माझे पापाजी नव्हते. केदारजी एकदम प्रसन्न दिसत होते. त्यांनी मला बोलावलं. मी समोर जाऊन बसलो. तर म्हणाले, ‘‘कुलवंत, त्या दिवशी मला खूप ताप आला होता. सर्दीमुळे जाम झालो होतो. तुझ्या पाया सूपमुळे बरं वाटलं. देव तुझं भलं करो.’’ त्यांनी मला जवळ घेऊन मस्तकाचं अवघ्राण केलं. आवडीचं मद्य मागवून त्याचा एकच पेग घेत त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या. त्या दिवसापासून आमच्यात गट्टी जमली. एकदा का गट्टी जमली, की मग तिथं वयाची मर्यादा राहत नाही. थोडय़ा वेळानं ते मला म्हणाले, ‘‘तू त्या दिवशी मी ड्रायव्हर का ठेवत नाही म्हणून विचारलंस. अरे, ड्रायव्हर ठेवायचा म्हणजे त्याला सांभाळून घेणं आलं. त्यात आपल्याला कोणाशी काही बोलायचं असेल, तर त्यावर बंधनं. नाही म्हटलं तरी, त्याच्या कानावर अनेक गोष्टी पडणार.. अगदी आपल्या खासगी गोष्टीही!’’ यावर त्यांनी डोळे मिचकावले आणि हसले.

त्यानंतर मात्र ते माझ्याशी खुलून बोलू लागले. केदारजी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील एकात्म पंजाबमधल्या नरोवल गावातले. अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. बालपणापासून नियतीशी झगडत त्यांनी आपला डाव मांडला होता. त्यांची दोन भावंडं बालपणीच वारली, एका बहिणीचं परिस्थितीजन्य क्षयामुळे निधन झालं. एक बहीण व भाऊ तेवढे हयात राहिले. शाळेत असतानाच त्यांना तत्त्वज्ञान, कथा, कविता, नाटक यांची गोडी लागली. याच काळात ते विविध कलांमध्ये प्रावीण्य मिळवत राहिले. नंतर अमृतसरच्या िहदू सभा कॉलेजमध्ये शिकायला गेल्यावर त्यांच्या कलांना बहर आला. त्यांच्याच पुढाकारानं कॉलेजमध्ये ड्रामॅटिक सोसायटीचा प्रारंभ झाला. तिथं त्यांनी व्यसनमुक्तीवरील एक नाटक सादर केलं होतं. ते पाहून अमृतसरमधील व्यसनमुक्ती संघटनेनं त्यांना मूकपट बनवण्याची विनंती केली आणि रुपेरी पडद्यावरील एका झगमगीत कारकीर्दीचा आरंभ झाला.

दरम्यान त्यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेजात इंग्रजी विषयात एम.ए. केलं. १९३२ साली लग्न केलं, तेव्हा २१ वर्षांचे होते. प्रचारकी थाटात सुरुवात केल्यानंतरही त्यांच्यातील अस्सल कवी जिवंत राहिला. परंतु कवित्वावर थोडीच गुजराण चालणार! केदारजी सांगत होते, ‘‘मैंने सोचा की सिनेमा में ही मेरी जिंदगी है। त्या काळात लाहोर, कलकत्ता आणि मुंबई अशा तीन ठिकाणी चित्रपट निर्मितीची केंद्रे होती. मला वाटलं, की कलकत्त्याला माझं जीवन उजळून निघेल. कारण तिथे देबकी बोस होते. त्यांच्या ‘पूरण भगत’ या चित्रपटानं मला त्यांना भेटण्याची प्रेरणा दिली. मी अमृतसरहून थेट कलकत्त्याला पोहोचलो. तिथं माझ्यासारखाच स्ट्रगल करणारे पृथ्वीराज कपूर भेटले. त्यांनी माझी ओळख कुंदनलाल सगलशी करून दिली. आम्ही तिघंही समानधर्मी होतो. तिघांच्याही वृत्ती चित्रपटाशी जोडल्या गेल्या होत्या. पृथ्वीजी, कुंदनलाल तोवर हिंदी, बंगाली चित्रपटसृष्टीत झगडत होते. त्यांना नाव मिळालं नव्हतं. कुंदनलाल मला देबकी बोस यांच्याकडे घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं की, ‘हा माझा मित्र आहे, कथा- कविता लिहितो, हा गाणी लिहील.’ तोवर देबकीबाबूंचा चेहरा दगडी दिसत होता. पण कुंदन त्यांना म्हणाला की, ‘हा चांगली चित्रंही काढतो.’ हे ऐकताच त्यांची कळी खुलली. त्यांना कुंदनला नाराज करायचं नव्हतं व माझीही परीक्षा घ्यायची होती. त्यांनी मला सेटपेंटिंग डिपार्टमेंटमध्ये धाडलं. मी काम करू लागलो.’’

नंतर केदारजींवर स्थिर छायाचित्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि चित्रपटात अभिनयाची संधीही मिळाली. काही दिवसांनी सगल, पृथ्वीराजजी मुंबईत आले आणि पाठोपाठ केदारजीही! इथे त्यांना मोठा ब्रेक मिळाला. सगल ‘देवदास’ करत होते आणि त्याची पटकथा, संवाद, गीतं लिहिण्याचं काम केदारजींना मिळालं. ‘‘देवदास में मेरे साथ और एक शख्स को चान्स मिला था,’’ केदारजी सांगत होते, ‘‘कॅमेरामन म्हणून बिमल रॉय यांना! कुंदनने मला कलकत्त्यात दिलेल्या संधीचं ऋण मी ‘देवदास’च्या माध्यमातून फेडलं. ‘देवदास’ची गाणी, संवाद सुपरहिट झाले. कुंदन नेहमी म्हणायचा, ‘यार केदार, तुमने मेरी करियर बना दी!’ खरं तर कुंदनसारखी माणसं क्वचित जन्माला येतात. त्यांना कोणीही घडवू शकत नाही. एखादा उत्प्रेरक असतो. त्यावेळी मी होतो, इतकंच!’’ एक गोष्ट नक्की, की त्या ‘देवदास’नं केदार शर्मा, बिमल रॉय आणि सगल यांना ओळख दिली.

केदारजींची गाडी त्यानंतर चौखूर धावू लागली. त्यांनी चित्रपटाच्या प्रत्येक घटकाचा नीट अभ्यास करून आपले पाय भक्कम रोवले.

मी त्यांच्यासाठी ‘प्रीतम’मधून जेवण घेऊन जात असे. त्यांच्याबरोबर जेवायला त्यांचं जवळचं मित्रमंडळ असे. त्यात खलनायक म्हणून गाजलेले के. एन. सिंग, जगदीश सेठी, पृथ्वीराजजी, सगल अशी माणसं असत. मी गेलो की, पृथ्वीराजपापा किंवा केदारजी मला बाजूला बसवून त्यांच्याबरोबर जेवायला लावत. त्यांच्या गप्पा ऐकताना मोठी मजा वाटे. एकमेकांची हळूच केलेली चेष्टामस्करी, एखाद्या भूमिकेबद्दलची चर्चा, नव्या चित्रपटाबद्दलचं बोलणं असं सारं त्यात असे. परंतु कमरेखालचं गॉसिपिंग करणं हा त्यांचा कोणाचाच स्वभाव नव्हता. आपापल्या उच्च शिक्षणाचा प्रभाव त्यांनी त्या अदबशीर वागण्यातही कायम ठेवला.

एका गप्पांत केदारजींनी राज कपूरजींच्या थपडेचा प्रसंग सांगितला. तो मी कधीच विसरलो नाही. कारण त्या थपडेची गुंज नंतर राजजींनीही मला सांगितली होती. राजजी शिक्षण सोडून रंगभूमी आणि चित्रपटांत करिअर करू पाहत होते. त्यांचा एकूण कल पाहून पृथ्वीराजपापांनी त्यांना केदारजींच्या ताब्यात दिलं आणि ‘चित्रपट बनविण्याची खुबी शिकून घे’ म्हणाले. त्या प्रशिक्षण काळात राजजी सायकलवरून ‘प्रीतम’मध्ये येत आणि केदारजींचा जेवणाचा डबा घेऊन जात. ‘‘राज को क्लॅप देना मैंने ही सिखाया। ज्याला योग्य पद्धतीनं क्लॅप देता आला त्याला चित्रपटाचा श्रीगणेशा आला! राज क्लॅप देत असे; पण हीरोसमोरचा क्लॅप असल्यास त्याच्यासारखे आपले केस आहेत की नाही ते आधी पाहून घेई आणि मग क्लॅप देई! त्याचं सतत लक्ष असे ते कॅमेऱ्याकडे आणि त्यातून आपली छबी कशी दिसत असेल, याकडे. एकदा एक कॅरेक्टर आर्टिस्ट सीन देत होता. त्याला मोठय़ा मिशा होत्या. स्वत:त रमलेल्या राजनं क्लॅप दिला खरा; पण तो इतक्या जवळून दिला, की क्लॅपच्या दोन पट्टय़ांत त्या नटाच्या मिशा अडकल्या व त्या निघाल्या! माझा राग अनावर होऊन मी सरळ त्याला एक थप्पड लगावली. गोऱ्यापान राजच्या गालावर माझ्या हाताच्या पाच बोटांची नक्षी उमटली. राज खजील झाला. घरी गेल्यावर त्यानं पृथ्वीराजना ही हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी ते राजसोबत सेटवर आले आणि माझा हात धरून म्हणाले, ‘तुम्ही योग्य गोष्ट केली.’ त्यांच्या या प्रतिक्रियेनं मी भारावलो. म्हणालो, ‘याला हीरो बनायचा शौक आहे, तर त्याला घेऊन मी एक चित्रपटच बनवतो.’’ त्या दिवशी केदारजींनी राजजी आणि मधुबाला यांना घेऊन नव्या चित्रपटाची घोषणा करतो असं सांगितलं. राजजी नंतर कधीतरी मला म्हणाले होते, ‘‘कुलवंत, ऐसी थप्पड हर एक को कभी ना कभी पडनी चाहिये.’’

अताउल्लाखान हा मधुबालाचा पिता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. मधूनं तोवर बालकलाकार म्हणून काही चित्रपट केले होते. ‘‘एका नवख्या कलाकाराबरोबर माझ्या मुलीला तुम्ही नायिका म्हणून कशी भूमिका देऊ शकता?’’ अशी विचारणा अताउल्लाखाननं केदारजींना केली. अताउल्लाखानचा आवाज वाढलेला पाहून केदारजी भडकले. त्याला म्हणाले, ‘‘हे माझं ऑफिस आहे. हळू अवाजात बोल. माझी योजना मान्य असेल तर सांग, नाही तर चालू लाग. मी मीनाकुमारीला घेतो.’’ अताउल्लाखान निघून गेला. दुसऱ्या दिवशी मधुबाला केदारजींना भेटली आणि तिनं होकार दिला. मग मधुबाला व राजजी यांना नायक-नायिका म्हणून पदार्पणाची संधी देणारा ‘नीलकमल’ हा चित्रपट केदारजींनी सादर केला. त्या चित्रपटात एक नितांतसुंदर गीत केदारजींनी लिहिलं होतं. ते मधूवर चित्रित होणारं पहिलं गाणं असणार होतं. ते गाणं चित्रित झालं खरं; पण पडद्यावर अंतिमत: आलं नाही वा त्यानंतर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात त्याचा समावेश केला गेला नाही.

पुढे मधू जेव्हा तिच्या अखेरच्या आजारपणात होती, त्या काळात केदारजी तिला भेटायला गेले आणि तिथून थेट ‘प्रीतम’मध्ये आले. कधी नव्हे ते त्या खमक्या माणसाच्या डोळ्यांत पाणी आलेलं मी पाहिलं. ते म्हणाले, ‘‘कुलवंत, मधू अखेरच्या घटका मोजतेय, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज कुठेही कमी झालेलं दिसत नाही. ती मला म्हणाली, ‘ते ‘नीलकमल’च्या वेळी माझ्यासाठी रचलेलं गाणं तुम्हाला आठवतं का?’ मी ‘हो’ म्हणालो आणि लगेच तिला लिहून दाखवलं. तिनं विचारलं, ‘हे अजून कुठे वापरलं नाही ना?’ मी ‘नाही’ म्हणालो. मधू म्हणाली, ‘हे गाणं माझ्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर दडलेलं आहे. मला तुम्ही वचन द्या, की हे गाणं तुम्ही यानंतर कधीही वापरणार नाही. ते माझ्याबरोबरच कबरीत जाईल.’ मी गुपचूप ‘हो’ म्हणालो आणि तो कागद तिच्या स्वाधीन केला. तिनं त्यावर मला सही करायला सांगितलं. अब वो गाना उसी की तरह किसी को भी नहीं मिलेगा.’’ केदारजींनी हळूच डोळे पुसले. शेवटी मधू ही त्यांचं ‘फाइंड’ होतं. तिच्याप्रमाणेच मीनाकुमारी, गीता बाली, तनुजा, भारतभूषण या त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या देणग्या आहेत.

केदारजी इतके मोठे कलाकार होते; पण त्यांचं ‘श्री साऊंड स्टुडिओ’मध्ये असलेलं कार्यालय अगदी छोटं होतं, फार फार तर दहा बाय दहा आकाराचं! मी त्यांना म्हणतही असे की, ‘‘तुम्ही इतके मोठे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कवी, गीतकार, अभिनेते आहात, मग या छोटय़ा कार्यालयात का?’’ ते म्हणत, ‘‘कुलवंत, ऑफिस छोटं असो की मोठं, तुमचं काम मोठं असायला हवं.’’ ते कामाचं तेवढं बोलत. अतिशय साधे होते ते. साधेसे कपडे, साधंसं वागणं. एवढं मोठं नाव होतं त्यांचं, पण त्याचा त्यांना अहंकार अजिबात नव्हता. कोणीही रसिक प्रेक्षक त्यांना भेटू शकत असे. एक प्रकारची फकिरी वृत्ती त्यांच्या अंगी होती.. राजस फकिरी!

ते त्यांच्या कलाकारांवर कधीही ‘बॉसिंग’ करत नसत. अभिनय वा एखादा प्रसंग उत्तम होण्यासाठी त्यांना मोकळीक देत. माझ्यासमोर घडलेली गोष्ट.. एका चित्रपटात गीता बालीला एक प्रसंग साकारायचा होता. ती अद्भुत कलाकार होती. अक्षरश: एकपाठी होती! केदारजींनी तिला प्रसंग समजावून दिला आणि अपेक्षित अभिनय कसा असायला हवा, तेही सांगितलं. गीता म्हणाली, ‘‘गुरुजी, मी थोडय़ा वेगळ्या प्रकारे करू का?’’ त्यांनी होकार दिला. म्हणाले, ‘‘आपण तुझ्या पद्धतीचा आणि मी दाखवलेला असा, दोन्ही प्रकारचा अभिनय चित्रित करून ठेवू. त्यातला योग्य वाटेल तो ठेवू या.’’ गीता तयार झाली. तो प्रसंग दोन्ही पद्धतींनी चित्रित झाला. केदारजींच्या पद्धतीचा प्रसंग उजवा ठरला. गीतानंही खेळकरपणे ते मान्य केलं. केदारजींनी तिच्या वेण्या गमतीत ओढल्या आणि डोक्यात एक टप्पल दिली. अशाप्रकारे आपल्या कलाकारांना समजून घेणारा हा दिग्दर्शक होता!

एकदा मी त्यांना सहज विचारलं की, ‘‘तुम्ही लिहिता कसे?’’ तर म्हणाले, ‘‘कुछ नहीं यार, बस्स लिहितो. नाही आवडलं तर ते खोडतो, परत लिहितो, परत परत लिहित जातो. जे लिखाण माझं मलाच आवडेल तेवढंच ठेवतो आणि बाकी फाडून टाकतो. ते शिल्लक ठेवतही नाही, न जाणो ते वापरायचा मोह व्हायचा! जे लेखन खुद्द लेखकाला आनंद देत नाही, ते वाचकाला थोडंच आवडणार?’’

स्वत:च्या आनंदातून मिळणारी ती अद्भुत फकिरी ज्याला गवसली त्याला जीवन गवसलं! केदारजींना असं जीवन गवसलं होतं!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर