प्रश्न सेना नेत्यांच्या हत्येचा नाही, तो एकटय़ा नगरचाही नाही; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्षमतेचा आहे..

ओरिसा राज्यात कलहंडी. बिहारात भागलपूर. त्या पंगतीत महाराष्ट्रात नगर जिल्ह्याचा समावेश करावा लागेल. कायदाशून्यता, गुंडगिरी आणि कुप्रशासन हा या तीनही जिल्ह्य़ांतील समान गुण. आज कलहंडी आणि भागलपूर येथील परिस्थिती पूर्वीइतकी वाईट नाही. परंतु ती उणीव नगर जिल्ह्य़ाने भरून काढण्याचे मनावर घेतलेले दिसते. कथित उच्चवर्णीय तरुणीवर प्रेम केले म्हणून ऊस कापण्याच्या यंत्रात घालून एका दलित तरुणाची हत्या, कोपर्डीतील नृशंस बलात्कार आणि त्यानंतरचे राजकारण आणि आता एका भुक्कड निवडणुकीतून दोघांचा भर दिवसा गावात खून असा या नामांकित नगर जिल्ह्य़ाचा अलीकडचा प्रवास आहे. त्या जिल्ह्य़ातील केडगाव येथे महापालिका निवडणुकीच्या राजकारणातून संजय कोतकर आणि वसंत ठुबे या शिवसेना पदाधिकाऱ्यांची भर दिवसा हत्या झाली. यामागे संग्राम आणि त्याचे तीर्थरूप अरुण हे जगताप आमदार पितापुत्र, त्यांचेच नातेवाईक शिवाजी कर्डिले यांचा हात असल्याचे बोलले जाते. यातील जगताप हे राष्ट्रवादीचे तर कर्डिले हे ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवून घेणाऱ्या भाजपचे. म्हणजे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एका बाजूला आणि दुसरीकडे शिवसेना असा हा मामला. वास्तविक शिवसेना पदाधिकारी हे संतमेळ्यातील सत्संगी असतात असे मुळीच नाही. येथे त्यांच्याबाबत जे घडले ते इतरांच्याबाबत करण्यात त्यांचा लौकिक. परंतु नगरमध्ये मात्र त्यांना अन्य पक्षीयांकडून मार खावा लागला. खरे तर या प्रकरणी कोणी कोणत्या पक्षाच्या नेत्याची हत्या केली असा विचार करताच येणार नाही. कारण पक्ष, निष्ठा, विचारधारा आदी मुद्दे एकंदरच कालबाह्य झाले असून नगर जिल्ह्यातील राजकारण्यांनी ते कधीच खुंटीला टांगून ठेवले आहेत.

याचे कारण यातील बहुतेक सर्व राजकारणी हे पशाच्या आणि त्यामुळे आलेल्या सत्तेच्या जोरावर माजलेले आहेत. पक्ष- मग तो कोणताही असो- हा त्यांच्यासाठी कायमच दुय्यम राहिलेला आहे. आणि राजकीय पक्षांच्या लेखी निवडून येण्याची क्षमता या एकाच गुणास महत्त्व असल्याने बाकीचे सारे दुर्गण त्यांच्यासाठी कमी महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे या जिल्ह्यातील कोणताही गुंडपुंड हा कोणत्या ना कोणत्या नेत्याने पाळलेला असतो आणि या अशा नेत्यांनी पक्ष पाळलेले असतात. सदर हत्याकांडातील शिवाजी कर्डिले हे याचे उदाहरण. हे सद्गृहस्थ सध्या भाजपमध्ये आहेत. ते मूळचे काँग्रेसचे. नंतर शरद पवारांचा जोर पाहून ते राष्ट्रवादीत गेले. या दोन्ही काँग्रेस २०१४ नंतर गटांगळ्या खाऊ लागल्यावर ते भाजपमध्ये गेले आणि भाजपनेही त्यांना पवित्र करून घेतले. पक्षाचा आडवा विस्तार करण्याच्या नादात भाजपने एकापेक्षा एक गणंगांना जवळ केले आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरूच असून तिच्या पहिल्या काही मानकऱ्यांतील एक हे कर्डिले. पक्षविस्ताराच्या मोहाने भाजप इतका आंधळा झालेला आहे की आपण कोणास जवळ करीत आहोत, त्याचा लौकिक काय हे पाहण्याचे भान त्या पक्षास नाही, हे तर खरेच. पण निदान पक्षबदलूंविरोधात काही गुन्हे आहेत किंवा काय हे तपासण्याचीदेखील तसदी घेण्याची गरज त्यास अलीकडे वाटत नाही. त्याचमुळे कर्डिले यांच्यासारखी व्यक्ती बेलाशक भाजपत सामील होते आणि तो पक्षदेखील कोणतीही चाड न बाळगता अशांना जवळ करतो. वास्तविक ही अशी बांडगुळे सर्वपक्षीय असतात. प्रत्येक सत्ताधाऱ्यास लोंबकळत आपली दुकानदारी शाबूत ठेवणे, इतकाच त्यांचा कार्यक्रम. नगर जिल्ह्यात याचे प्रत्यंतर येते.

अटक झालेले संग्राम जगताप हे निवडून आलेले आमदार. त्यांचे तीर्थरूप हे विधान परिषदेवर. हे दोघे राष्ट्रवादी पक्षाचे. आणि त्यांचे व्याही शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे. असा हा घृणास्पद त्रिकोण. सत्ता कोणाचीही येवो, या अशा मंडळींचे सत्ताधीशांशी लागेबांधे अनिर्बंध असतात. नगर जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोहोळ. विखेपाटील, थोरात, गडाख असे एकापेक्षा एक महारथी या एकाच जिल्ह्यातून येतात. तसेच राज्यातील सहकारी साखर कारखानदारीचे देखील नगर हे सर्वात मोठे केंद्र. या एकाच जिल्ह्यात दोन डझनांहून अधिक साखर कारखाने आहेत. परंतु म्हणून जिल्हा सधन आहे असे नाही. सधन आहे ते या जिल्ह्याचे नेतृत्व. एरवी हा जिल्हा आणि राज्यातील अन्य एखादा दरिद्री जिल्हा यांत काहीही फरक नाही. अशा वातावरणात धडदांडग्या नेत्यांचे आपापले दरबार तयार होतात आणि या दरबारांतील मनसबदार आपापले सवतेसुभे मांडू लागतात. नगर जिल्ह्यात नेमके हेच झाले आहे. प्रत्येक बडय़ा नेत्याचे प्रभाव क्षेत्र आणि त्यात आपापली बांडगुळे. आपापली जहागिरी कायम ठेवणे इतकाच काय तो यांचा कार्यक्रम. त्यामुळे पक्ष वगैरे यंत्रणांचे त्यांना काहीही पडलेले नसते. आताचे हत्याकांड हेच नग्न वास्तव अधोरेखित करते. वास्तविक महाराष्ट्राच्या सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना हे युतीत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्ताधारी सेना-भाजपचे कडवे शत्रू. परंतु नगर जिल्ह्यातील या निवडणुकीत सत्तासोबत आहे ती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांची. या तिघांची युती का? तर शिवसेनेस दूर ठेवता यावे यासाठी. हा जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा बालेकिल्ला. पण महापालिकांत सत्ता शिवसेनेची. तेव्हा शिवसेनेस बाहेर ठेवण्यासाठी हे तिघे एकत्र. बरे, यामागे काही विचार आहे म्हणावे तर तेही नाही. अन्य काही जिल्ह्यांत दुसरे काही समीकरण. सध्या राज्यात सत्ता भाजपची असल्याने सत्तासमीकरणांतील हुकमी हातचा हा त्या पक्षाचा असतो.

हे सारे इतके क्षुद्र आहे. एरवी ते दखल घेण्याच्या लायकीचेही नाही. परंतु या प्रसंगात मोठी िहसा झालेली असल्याने ते गंभीर ठरते. तसेच या हिंसेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलीस गेले असता जे काही घडले त्यामुळे ते अधिक गंभीर आहे. या आमदार पितापुत्रांच्या समर्थकांनी पोलिसांना अक्षरश: हुसकावून लावले. या जमावाने पोलिसांवर हात टाकला नाही, म्हणून त्यांची थोडी तरी अब्रू वाचली. शेवटी अधिक कुमक मागवून पोलिसांना कारवाई करावी लागली. राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती आहे. या गृह खात्यास आव्हान हे थेट मुख्यमंत्र्यांच्या अधिकारास आव्हान आहे. ते देणाऱ्यातील एक मुख्यमंत्र्यांचा स्वपक्षीय आहे. अशा वेळी या स्वपक्षीयावर कारवाई करावी लागेल म्हणून मुख्यमंत्र्यांचे हात थिजणार की आपपरभाव न करता ते कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्था, वाढता भ्रष्टाचार वगैरे मुद्दय़ांवर भाजपने आणि त्यातही विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी आकांडतांडव करून सत्ताबदलासाठी वातावरणनिर्मिती केली. त्यानुसार सत्ताबदल झाला. पण तेव्हाचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे गुंड हेदेखील भाजपच्या आश्रयास आले. परिणामी सत्ताबदलाचा अपेक्षित परिणाम दिसलाच नाही. जे झाले ते सुधारणेच्या पलीकडे गेले. परंतु जे घडत आहे त्याचा मार्ग बदलण्याची संधी या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली आहे. ती त्यांनी साधावी. कारण प्रश्न सेना नेत्यांच्या हत्येचा नाही. तो नगरचाही नाही; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्षमतेचा आहे. हिंदीत ‘अंधेर नगरी, चौपट राजा’ अशी म्हण आहे. महाराष्ट्रात अंधेर नगर आहे. पण राजा चौपट आहे की नाही हे फडणवीस यांना दाखवून द्यावे लागेल.