पंतप्रधानपदावर राहण्याचे स्वप्न मोदी आणि भाजपला सत्यात आणावयाचे असेल तर त्यात महाराष्ट्राचापर्यायाने पवारांचावाटा सिंहाचा ठरतो.. 

कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी किमान दोन सत्ये असतात. एक निवडणूकपूर्व आणि दुसरे निवडणुकोत्तर. तेव्हा त्या न्यायानुसार मोदी यांनी शरदरावांना निवडणूकपूर्व सत्य जाणिवेत भ्रष्टाचार शिरोमणी म्हटले. तेव्हा ते सत्य होते. परंतु निवडणुकीनंतरचे सत्य वेगळे असते..

आपल्या मंत्रिमंडळात अनेक रत्ने आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमानाने रविवारी गोव्यात बोलताना सांगितले. त्याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. खरे तर मोदी यांनी आपले मंत्रिमंडळ ही नररत्नांची खाणच आहे, असे म्हणणे अधिक वास्तववादी ठरले असते. या रत्नांत उमा भारती किंवा गिरिराज सिंग किंवा रामदास आठवले अशा अनेकांचा समावेश असणार. तो असायलाच हवा. या रत्नसमुच्चयामुळेच मोदी यांची खरी ओळख रत्नपारखी अशी होते. उमा भारती असोत किंवा गिरिराज सिंग किंवा त्यांच्या सरकारने केलेल्या विविध नेमणुका असोत. ही सारी उत्तम रत्नपारख्याचीच लक्षणे. आपल्या पुण्यातील फिल्म इन्स्टिटय़ूटच्या प्रमुखपदासाठी गजेंद्र चौहान यांच्यासारखा नरपुंगव ही अशी रत्नपारखी नजर असल्याखेरीज आढळणे शक्यच नाही. गोव्यात त्यांनी आपल्यातील रत्नपारखीपणाची ओळख दिली ती मनोहर पर्रिकर यांच्यासाठी. एरवी गोव्यात असा खाणींना तोटा नाही. परंतु या खाणींतून निपजते ते लोहखनिज. भाजपशी संबंधित अनेकांचा या लोहखनिजाशी जवळचा संबंध. आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आणि तूर्त काँग्रेसवासी असलेले दिगंबर कामत हे एके काळचे भाजपचेच. त्याच एके काळी ते पर्रिकर यांचे निकटवर्तीही होते. आता ते पर्रिकर यांच्यासमवेत नसल्याने पर्रिकर यांचे तेज अधिक उजळून दिसत असावे. माझ्या मंत्रिमंडळातील अनेक रत्नांपैकी सर्वात तेजस्वी रत्न म्हणजे मनोहर पर्रिकर, असे मोदी म्हणाले. पर्रिकर यांची अलीकडची काही उत्तम वक्तव्ये लक्षात घेता ते सर्वात तळपणारे रत्न आहे, याबाबत कोणालाच शंका असणार नाही. तेव्हा मोदी यांनी पर्रिकर यांच्यातील रत्नाचे जाहीर कोडकौतुक केले ते उत्तम झाले. आपल्याच सहकाऱ्याच्या कौतुकासाठी मनाचा मोकळेपणा लागतो. मोदी यांच्यातील हा मोकळेपणा यामुळे दिसून आला. परंतु मोदी यांची खरी ओळख ही मंत्रिमंडळातील रत्नांपेक्षा बाहेरील रत्नांसाठी आहे. बाबा रामदेव, काही उद्योगपती वगैरेंची महती जनतेस कळली ती केवळ मोदी यांच्यातील रत्नपारख्यामुळे. या मालिकेतील एक महत्त्वाची असामी म्हणजे नामदार शरदचंद्ररावजी पवार.

या महाराष्ट्राला पवारांची महती आणि मोठेपण कधीच उमगलेले आहे. आमच्याही मनात त्याबाबत काही शंका नाही. १९७८ साली वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी काँग्रेसातील अनेक बहरलेल्या वसंतांना झोपवून मुख्यमंत्रिपद मिळवणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. ते फक्त शरदरावच करू जाणोत. ग्रामीण भागाशी एकरूप होऊन त्याच वेळी उच्चभ्रूंना भावणाऱ्या तारांकित क्रिकेट आदी उद्योगांवरही स्वत:ची हुकमत निर्माण करणे हेदेखील सोम्यागोम्याचे काम नाही. सर्वसाधारण मर्त्य माणसे एका वेळी एकच वेश परिधान करू शकतात. परंतु शरदरावांसारख्या असामी एकाच वेळी धोतराचा काचा मारून वर पुन्हा पाश्चात्त्य पाटलोण, कोट-टाय वगैरेत औंदा जोंधळ्याची चर्चा करता करता फडर्य़ा विंग्रजीत आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणावर दुबई आदी ठिकाणी परिसंवादात सहभागी होऊ शकतात. त्यांचे हे कौशल्य या महाराष्ट्राला ठाऊक होते. परंतु मोदी यांचे आभार अशासाठी मानावयाचे की त्यांनी शरदरावांची थोरवी संपूर्ण देशात पोहोचवली. रविवारी पुण्याजवळील समारंभात त्यांनी शरदरावांवर फेकलेल्या स्तुतिसुमनांनी कोणाचाही श्वास कोंडावा. आता या वेळी हे सोयीस्कररीत्या विसरायला हवे की याच मोदी यांनी याच शरदरावांचे वर्णन भ्रष्टाचाराचा शिरोमणी असे केले होते. आता हे वाचून काही पामरांना- जे भक्त नाहीत- त्यांना असा प्रश्न पडेल की मोदींचे कोणते वचन खरे मानायचे? ते की हे? त्यावर अशा मूढजनांना सांगावयास हवे की कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी किमान दोन सत्ये असतात. एक निवडणूकपूर्व आणि दुसरे निवडणुकोत्तर. तेव्हा त्या न्यायानुसार मोदी यांनी शरदरावांना निवडणूकपूर्व सत्य जाणिवेत भ्रष्टाचार शिरोमणी म्हटले. तेव्हा ते सत्य होते. परंतु निवडणुकीनंतरचे सत्य वेगळे असते. निवडणुकीत माणसे नाही म्हटले तरी काहीही बोलतात. उदाहरणार्थ खुद्द मोदीच नव्हते का म्हणाले की मी सत्तेवर आल्यास इतका काळा पैसा हुडकेन आणि प्रत्येकाच्या बँक अकौंटात १५ लाख रुपयांची भर करेन म्हणून. तेदेखील निवडणूकपूर्व सत्यच होते. त्या सत्याचे निवडणुकीनंतर परिवर्तन झाले. तसेच शरदराव हे निवडणूकपूर्व सत्यानुसार भ्रष्टाचाराचे शिरोमणी असले तरी निवडणुकोत्तर सत्यानुसार ते आदर्श लोकप्रतिनिधी ठरले. दोन्हीही विधाने मोदींचीच. बदल झाला तो परिस्थितीत आणि परिस्थितीनुसार सत्यात. आणि यावर आपण विश्वास ठेवायलाच हवा, याचे कारण मोदी का कधी खोटे बोलतात? देशासाठी त्यांनी घर, दार, संसार आदींचा त्याग केला. तेव्हा मोदी म्हणतात ते सत्यच असणार आणि ज्या अर्थी ते सत्य आहे त्या अर्थी आपणासाठी विश्वास ठेवण्यासारखेच असणार, यात शंका ती काय? परंतु सत्य असे वृक्षाच्या खोडासारखे असते. खोडास ज्याप्रमाणे अनेक फांद्या असतात आणि त्या फांद्यांना उपफांद्या असतात त्याप्रमाणे सत्यालाही अनेक उपसत्ये असतात आणि त्या उपसत्यांना उपउपसत्ये लोंबकळत असतात.

तर शरदराव हे मोदी यांच्यासाठी आदर्श लोकप्रतिनिधी आहेत, शरदरावांचे बोट धरून आपण बरेच काही शिकलो असे जे काही मोदी म्हणतात ते पूर्ण सत्य आहे. यातील एक उपसत्य शरदरावांकडून तुम्ही काय शिकलात या प्रश्नाच्या जमेल तितक्या प्रामाणिक उत्तरात दडलेले आहे, हे भक्त वगळता अन्य चाणाक्षांच्या ध्यानात यावयास वेळ लागणार नाही. परंतु या चाणाक्षांच्याही ध्यानात येणार नाही, अशा दोन उपसत्यांचा वा उपउपसत्यांचा उल्लेख येथे करावयास हवा. यातील एक सत्य हे शरदराव हे मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात असतानाचे आहे. त्या वेळी काँग्रेसचे अनेक मुखंड तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागे हात धुऊन लागले असताना दिल्लीत शरदरावांनी त्या वेळी सातत्याने मोदी यांची कड घेतली. त्यामुळे मोदी यांना अधिक छळण्याचे काँग्रेस नेतृत्वाचे मनसुबे यशस्वी होऊ शकले नाहीत. मोदी हे शरदरावांचे नेहमीच ऋणी असतात ते त्यामुळे. अर्थात महाराष्ट्रवासीयांना यात काही नवे नाही. याचे कारण शरदरावांना फारच दूरचे दिसते. केवळ तबेल्याकडे नजर टाकून कोणता घोडा शर्यतीत जिंकणार आहे हे जाणण्याचे असामान्य कसब त्यांच्या ठायी आहे. त्यामुळे मोदी यांचे मन जिंकण्याची महती त्यांना सर्वाआधीच लक्षात आली, यात काहीही धक्कादायक नाही. आता सत्य क्रमांक दोन. पहिले भूतकाळाशी निगडित तर दुसरे भविष्याशी. ते म्हणजे २०१९ सालातील लोकसभा निवडणुका. त्या निवडणुकांनंतर पुन्हा पंतप्रधानपदावर राहण्याचे स्वप्न मोदी आणि भाजपला सत्यात आणावयाचे असेल तर त्यात महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा ठरतो. याचे कारण या राज्यातून तब्बल ४८ खासदार निवडून जातात. इतके मोठे राज्य एकच. उत्तर प्रदेश. परंतु त्या राज्यातील ८० पैकी ७२ जागांवर गेल्याच निवडणुकांत भाजपचे खासदार आले आहेत. ही विक्रमी कामगिरी. यापुढे यात आता अधिक वाढ होण्याची शक्यता नाही. झाली तर घटच होईल. खेरीज, बिहार, तामिळनाडू अशा अन्य राज्यांचा तितका भरवसा नाही. तेव्हा महाराष्ट्र भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा.

आणि म्हणून अर्थातच शरद पवार महत्त्वाचे. काँग्रेसचे उमेदवार पाडण्याची, विरोधकांत फाटाफूट घडवून आणण्याची ताकद आज जेवढी शरदरावांकडे आहे, तितकी अन्य पक्षसमुदायांतही नाही. तेव्हा त्या निवडणुकांत शरदराव जर प्रत्यक्षपणे नाही तरी निदान अप्रत्यक्षपणे साथीला असतील तर अन्य पक्षीयांच्या पराभवाची हमी नक्कीच. म्हणून पवार आणि मोदी यांच्यातील हे साखरसत्य आपण लक्षात घ्यावयास हवे. भ्रष्टाचार आदी मुद्दे आहेतच. त्यांपेक्षा हे सत्य महत्त्वाचे. ते लक्षात घेऊन मोदी वा त्यांच्या कोटय़वधी भक्तगणांनी एक करावे. मोदी यांना महात्मा गांधी प्रात:स्मरणीय आहेत. त्या महात्म्याने माझे सत्याचे प्रयोग लिहिले. त्याचा दुसरा भाग मोदी वा त्यांच्या वतीने कोणी लिहावा. ‘माझे साखरसत्याचे प्रयोग.’