देशाच्या म्युच्युअल फंड उद्योगात सरलेल्या २०१९-२० आर्थिक वर्षांत एकूण गुंतवणूक खात्यांमध्ये (फोलियो) ९ टक्क्य़ांची भर पडून त्यांची एकूण संख्या ८.९७ कोटींवर गेली आहे. अव्वल चार फंड घराण्यांची या संबंधाने भरीव कामगिरी राहिली आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इंडियाने सध्या कार्यरत ४५ म्युच्युअल फंड घराण्यांच्या एकूण फोलियोंची संख्या मार्च २०२० अखेर ८.९७ कोटी झाली असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध आकडेवारीतून स्पष्ट केले आहे. मार्च २०१९ अखेर त्यांची संख्या ८.२५ कोटी होती, जी यंदा ९ टक्के वाढली आहे. ४५ फंड घराण्यांपैकी बहुतांशांनी नवीन गुंतवणूकदारांची भर घातली असली तरी ११ फंड घराण्यांचे गुंतवणूकदार गत वर्षभरात घटले असल्याचे आकडेवारी दाखवते.

उपलब्ध आकडेवारीच्या अर्थलाभ डॉट कॉमने केलेल्या विश्लेषणानुसार, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या फोलियोंचे एकूण प्रमाण ९३.८४ लाख असे झाले आहे. २०१९-२० सालातील गुंतवणूकदार संख्येतील ही कोणाही फंड घराण्याने नोंदविलेली ही सर्वाधिक २२ टक्क्य़ांची वाढ आहे. त्या खालोखाल एसबीआय एमएफ ९ टक्के वाढीसह ८५.७१ लाख एचडीएफसी एमएफ ३ टक्के वाढीसह ९४.२६ लाख, आदित्य बिर्ला सनलाइफ फोलियोंच्या संख्येत एक टक्क्य़ांची वाढ साधत ती ७१.८६ लाखांवर नेली आहे.

गुंतवणूकदार परिपक्व बनत चालले असून, बाजार जोखमीची समजही वाढली आहे. शिवाय डिजिटल सुविधांवर केंद्रीत केलेले लक्ष आणि गत २० वर्षांत एकदा गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा जाईल असे वर्तन राहिले नसल्यामुळे आपल्या फंड घराण्याच्या फोलियोच्या संख्येत मागील वर्षांपेक्षा अधिक आणि सर्वश्रेष्ठ वाढ दिसून येते, अशी प्रतिक्रिया आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी निमेश शहा यांनी व्यक्त केली.