देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तफावत कमी झाल्याने, चालू खात्यावरील तूट अर्थात ‘कॅड’ संपुष्टात येऊन, उलट जानेवारी ते मार्च २०२० या तिमाहीत त्या खात्यावर किंचित आधिक्य दिसून आले आहे. करोनाकाळात अर्थव्यवस्थेपुढे अनेकांगी आव्हाने उभी असताना हा एक दिलासाच ठरावा. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मते, गत १३ वर्षांत प्रथमच चालू खाते शिलकीत असल्याचे दिसले आहे.

सरलेल्या २०१९-२० आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत चालू खात्यावर ०.६ अब्ज डॉलरचे आधिक्य दिसून आले. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन – जीडीपीच्या तुलनेत हे प्रमाण ०.१ टक्का इतके आहे. मागील वर्षांच्या चौथ्या तिमाहीत भारताच्या चालू खात्यावर ४.६ अब्ज डॉलरची (जीडीपीच्या तुलनेत ०.७ टक्के) तूट होती.

रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी उशिरा प्रसिद्ध केलेल्या सांख्यिकीय अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मागील १३ वर्षांत प्रथमच चालू खाते शिलकीत दिसून आले आहे. संपूर्ण २०१९-२० आर्थिक वर्षांत चालू खात्यावर तूट घसरून, जीडीपीच्या ०.९ टक्क्यांवर सीमित राहिली आहे. २०१८-१९ मध्ये या तुटीचे प्रमाण जीडीपीच्या २.१ टक्के इतके होते.

वर्षांरंभापासून खनिज तेलाच्या किमती या घसरत असून, फेब्रुवारी-मार्चमध्ये त्या सार्वकालिक नीचांक स्तरावर पोहचल्या. त्यामुळे भारताच्या आयात खर्चात लक्षणीय कपात झाली. चालू खात्यावरील शिल्लक, ही देशाच्या निर्यात महसुलाचे आणि वस्तू व सेवांच्या आयातीचा मेळ घालते. त्याचप्रमाणे परदेशी गुंतवणूकदारांना अदा केलेली देयके किंवा त्यांच्याकडून झालेली गुंतवणूक, विदेशात नोकरी-पेशावर असलेल्या भारतीयांकडून देशामध्ये झालेले निधी हस्तांतरण हे घटक जमेस धरले जातात. तर भारतातून परदेशात अदा केली जाणारी देयके, लाभांश-उत्पन्नाचे वितरण खर्चाच्या बाबी म्हणून गणल्या जातात.

सरलेल्या मार्च तिमाहीत थेट विदेशी गुंतवणूक दुपटीने वाढली, म्हणजे आधीच्या वर्षांत याच तिमाहीत झालेल्या ६.४ अब्ज डॉलरच्या तुलनेत ती १२ अब्ज डॉलरवर गेली. बरोबरीने भांडवली बाजारात १३.७ अब्ज डॉलरची परदेशी गुंतवणूक हे शिलकीतील चालू खात्यामागील प्रमुख कारण रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले आहे.

भारत-चीन व्यापार तुटीत घट

चीनकडून होणाऱ्या आयातीत लक्षणीय घट झाल्याने भारत-चीन दरम्यान व्यापार तूट सरलेल्या २०१९-२० आर्थिक वर्षांत ४८.६६ अब्ज डॉलरवर घसरली आहे. भारतातून चीनला झालेल्या निर्यातीचे प्रमाण १६.६ अब्ज डॉलरचे तर, चीनकडून भारताने केलेल्या आयातीचे प्रमाण आर्थिक वर्षांत ६५.२६ अब्ज डॉलर इतके होते. दोहोंतील ही तफावत म्हणजे व्यापार तूट २०१८-१९ मध्ये ५३.५६ अब्ज डॉलर आणि २०१७-१८ मध्ये ६३ अब्ज डॉलर इतकी होती.