स्टेट बँकेकडून सुरुवात; ठेवींवरील व्याजदरात मात्र कपात
देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँक- स्टेट बँकेचे गृह कर्ज वार्षिक ८ टक्क्यांच्या आणखी खाली आले आहे. बँकेने याबाबतचा ‘एमसीएलआर’ ७.९० टक्क्यांवर आणून ठेवल्याचे शुक्रवारी जाहीर केले. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १० फेब्रुवारीपासून होणार आहे.
बँकेचे सर्वात कमी कालावधीचे, ७ ते ४५ दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदर स्थिर आहेत. मात्र ४६ ते १७९ दिवसांसाठी ते १० वर्षेपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याज दर ०.१० ते ०.५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
चालू आर्थिक वर्षांत सलग नववी व्याजदर कपात करताना स्टेट बँकेने ठेवींवरील दरातही कपात केली आहे. बँकेने विविध मुदतीच्या ठेवींचे दर अध्र्या टक्क्यापर्यंत कमी केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातीलच ओरिएंट बँक ऑफ कॉमर्सने ०.१० टक्क्यापर्यंत ‘एमसीएलआर’ कमी केल्याने या बँकेचेही गृह आदी कर्ज स्वस्त झाले आहेत.
रिझव्र्ह बँकेने स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्टेट बँकेसह बँक ऑफ इंडियानेही तिचे गृह तसेच वाहन कर्ज व्याजदर कमी केले. बँक ऑफ इंडियाचा गृह कर्ज व्याजदर आता वार्षिक ८ टक्के तर वाहन कर्ज दर ८.५० टक्के असेल.
वाणिज्य बँकांना कर्ज स्वस्ताईस मुख्य अडसर ठरत असलेल्या अल्पमुदतीच्या सरकारी रोख्यांचा परतावा दर रिझव्र्ह बँकेकडून प्रस्तावित नव्या ‘रेपोज्’ पद्धतीने प्रभावित होईल आणि पर्यायाने दीर्घ मुदतीच्या रोख्यांचा परतावा दरही कमी होईल. प्रत्यक्ष व्याजदर कपातीपेक्षा प्रभावी अशी ‘रेपोज्’ पद्धती असल्याचा विश्लेषकांचा कयास आहे. अल्पबचतीच्या योजनांचे व्याजदरही एप्रिलपासून आणखी घसरणे अपेक्षित असताना, बँकांना त्यांच्या ठेवींवरील व्याजदरही परिणामी खाली आणता येईल आणि पर्यायाने कर्जाच्या व्याजदरातही आनुषंगिक कपात होईल.