खासगी क्षेत्रातील आघाडीच्या कोटक मिहद्र बँकेनेही सोशल नेटवर्किंग साइटचे व्यासपीठ जोपासले आहे. बँकेने नवे चालू खाते उत्पादन सादर करताना ग्राहकांना त्यातील जमा रक्कम आदी हाताळण्याची संधी या दोन संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या व्यासपीठावरील कोटक बँकेच्या २१ हून अधिक सेवांचा लाभ खातेदारांना घेता येईल, अशी माहिती बँकेच्या ग्राहक विभागाचे प्रमुख के. व्ही. एस. मनियन यांनी बुधवारी मुंबईत सांगितले. यासाठी खास ‘जिफी’ असे नाव खाते उत्पादनाला देण्यात आले आहे. देशातील मुंबई-पुण्यासह ११ शहरांमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे. फेसबुक अथवा ईमेलद्वारे हे खाते सुरू करता येईल. या खात्यासाठी किमान ठेवण्याची सक्ती नसून ५,००० रुपयांद्वारे हे खाते सुरू करता येईल. खात्यात २५ हजार रुपयांवर रक्कम झाल्यास ती आपोआपच मुदत ठेव म्हणून बाजूला केली जाईल. फेसबुकद्वारे खाते हाताळण्याची सुविधा बँकिंग क्षेत्रात ‘आयसीआयसीआय’ या खासगी बँकेने सुरू केली होती. तर अ‍ॅक्सिस बँकेप्रमाणे ‘ई-केवायसी’ सुविधाही कोटक महिंद्र लवकरच सुरू करण्याच्या तयारीत आहे.