रिलायन्सशी भागीदारीसाठी बोलणी

कोकणात नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या स्थलांतराच्या संकेतानंतरही सकारात्मकता व्यक्त करतानाच, सौदी आराम्को या जगातील सर्वात मोठय़ा तेल निर्यातदार कंपनीने, भारतातील गुंतवणुकीबाबत आशावाद कायम असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. रिलायन्स इंडस्ट्रीजशीही भागीदारीतून तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले.

भारतातील इंधनाची वाढती मागणी पाहता, येथे अधिकाधिक गुंतवणूक करण्यात स्वारस्य असल्याचे सौदी आराम्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन अल्-नासेर यांनी पत्रकारांना सांगितले. भारतातील गुंतवणुकीबाबत आपण खूपच सकारात्मक असून, चिंतेचे कारण नसल्याची ग्वाही भागीदारांकडून मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या निवडणूक युतीचा मार्ग प्रस्तावित नाणार प्रकल्प स्थलांतरित करूनच सुकर झाला असून, या वार्षिक ६ कोटी टन उत्पादन क्षमतेच्या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याचे वाटत नाही काय, या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी हे स्पष्टीकरण केले.

जरी सध्या काही दिरंगाई होत असली तरी पुढे वाया गेलेला वेळ भरून काढला जाईल. कामे प्रगतिपथावर असल्याचेच आपण भागीदारांकडून ऐकत असून, भवितव्याबाबत पूर्णपणे सकारात्मक आहोत, असे उत्तर नासेर यांनी प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधण्यात वेळ जाण्याच्या शक्यतेबाबत प्रश्न केला असता दिले.

सौदी आराम्कोने संयुक्त अरब अमिरातीतील भागीदार कंपनी अ‍ॅडनॉकसह नाणार (रत्नागिरी) येथे ४४ अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवणुकीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित केला आहे. यात भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांची ५० टक्के भागीदारी आहे. उभयतांमध्ये झालेल्या करारान्वये हा प्रकल्प २०२५ सालात कार्यान्वित होणे अपेक्षित होते. तथापि स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध आणि त्याचे सत्ताधारी युतीतील भागीदार शिवसेनेने निवडणुकांच्या तोंडावर या मुद्दय़ाचे राजकीय भांडवल केल्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र हलविला जाण्याचे संकेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत.

भारतात अन्य भागीदारांशीही बोलणी सुरू असून, येथील गुंतवणूक ही केवळ नाणार प्रकल्पापुरती मर्यादित नाही, असे नासेर यांनी स्पष्ट केले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अन्य कंपन्यांबरोबरच्या वाटाघाटीतून नव्या गुंतवणूक संधी हेरल्या जातील, अशी त्यांनी पुस्ती जोडली. सौदी आराम्कोकडून वार्षिक ८,००,००० बॅरल खनिज तेल भारतात निर्यात केले जाते, वर्षांगणिक भारतात वाढत असलेली तेलाची मागणी उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.

सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल-फलिह डिसेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी मुकेश अंबानी यांची भेट घेतली होती. त्याच वेळेस सौदी आराम्को आणि रिलायन्सदरम्यान भागीदारीच्या चर्चेला सुरुवात झाल्याचे समजते. अल-फलिह यांनी अंबानी यांच्या कन्येच्या विवाहपूर्व सोहळ्यातही उपस्थिती दर्शविली होती. या चर्चेचा पाठपुरावा म्हणून गेल्या महिन्यात सौदी आराम्कोचे मुख्याधिकारी आणि अंबानी यांचीही भेट झाली होती.