सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी स्टेट बँकने सरलेल्या जानेवारी-मार्च तिमाहीत वार्षिक तुलनेत नफ्याकडून तोटय़ाकडे प्रवास नोंदविला आहे. वाढत्या थकीत कर्जामुळे बँकेने ३१ मार्च २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीत ७,७१८ कोटी रुपयांचा तोटा सोसला आहे. तिमाहीगणिक बँकेचा तोटा विस्तारला आहेच, संपूर्ण २०१७-१८ वित्त वर्षांत तिला ६,५४७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बँकेने यंदा ऐतिहासिक तोटा नोंदविला आहे.

स्टेट बँकेला मार्च २०१७ अखेरच्या तिमाहीत २,८१५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर २०१६-१७ मधील बँकेचा नफा १०,४८४ कोटी रुपये होता. वाढत्या बुडीत कर्जासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीपोटीही बँकेला अधिकच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

मार्चअखेरच्या तिमाहीत बँकेला अनुत्पादित मालमत्तेपोटी करावी लागणारी तरतूद तब्बल ११९ टक्क्यांनी वाढली असून ती २४,०८० कोटी रुपये झाली आहे. तिमाहीत बँकेच्या परिचालन नफ्यात, निव्वळ व्याज उत्पन्नातही घसरण झाली आहे.

बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण मार्च २०१७ अखेर वर्षभरापूर्वीच्या ६.९० टक्क्यांवरून १०.९१ टक्क्यांवर झेपावले आहे. तर निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ३.७१ टक्क्यांवरून ५.७३ टक्क्यांवर गेले आहे. बँकेने निर्लेखित केलेल्या कर्जाच्या वसुलीचे प्रमाण मात्र २१.१८ टक्क्यांनी वाढले आहे. नादारी-दिवाळखोरी संहितेंर्गत रिझव्‍‌र्ह बँक निश्चित १२ बडय़ा थकीत कर्ज खात्यातील रक्कम १.७५ लाख कोटी रुपयांची आहे.

दरम्यान, तोटा घोषित झाल्यानंतरही बँकेचा समभाग जवळपास ३ टक्क्य़ांनी वाढला.

भूषण स्टील विक्रीची एसबीआय सर्वाधिक लाभार्थी

प्रचंड कर्जभार असलेल्या भूषण स्टीलच्या विक्रीचा सर्वाधिक लाभ स्टेट बँकेला होईल, असा दावा बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी  केला. भूषण स्टीलची खरेदी टाटा स्टीलने कर्ज दायीत्वासह केली आहे. एकूण ७,५०० कोटींच्या कर्जभारातील स्टेट बँकेच्या वाटय़ाचे १,३०० कोटी रुपये वसुल होणार आहेत. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाअंतर्गत येणाऱ्या थकीत कर्जखात्याकरिता तरतुदीचे प्रमाण यंदा ५० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.