सलग दुसऱ्या व्यवहारात वाढ नोंदवत सेन्सेक्सने मंगळवारी ती आणखी विस्तारली. सोमवारच्या शतकी अंशवाढीनंतर मुंबई निर्देशांक दुसऱ्या सत्रात १७०.०९ अंश वाढ नोंदविली. यामुळे सेन्सेक्स २५,३२०.४४ पर्यंत गेला. ५०.८५ अंशवाढीमुळे निफ्टीला त्याचा ७,७०० पुढील स्तरही अनुभवता आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा निर्देशांक सत्रअखेर ७,७००.९० वर पोहोचला.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीच्या फलिताची प्रतीक्षा करत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीने घसरत असलेल्या खनिज तेलाच्या दरांवर गुंतवणूकदारांनी मंगळवारी भांडवली बाजारात समभाग खरेदीचे सत्र अनुभवले. खनिज तेल सध्या गेल्या ११ वर्षांच्या नीचांकात आहेत.
व्यवहारात डॉलरच्या तुलनेत उंचावणाऱ्या रुपयाचेही या वेळी स्वागत झाले. सत्रात ६६.९३ पर्यंत उंचावताना रुपया त्याच्या २७ महिन्यांच्या तळातून वर आला होता.
मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्सने २५ हजारांचा तळ अनुभवल्यानंतर पुढे सत्रअखेरर्प्यत वाढ कायम राखली. सत्रात त्याचा २५,३४२.७८ हा वरचा टप्पा राहिला. व्यवहारात ७,७०५ पर्यंत झेप घेणारा निफ्टी सत्रात ७,७०० च्याही खाली उतरला होता. मात्र दिवसअखेर तोही वाढला.
सेन्सेक्समध्ये रिलायन्स, ओएनजीसी, ल्युपिन, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एचडीएफसी, मारुती, हिरो, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल, आयटीसी, इन्फोसिस, एल अ‍ॅन्ड टी, सन फार्मा, हिंदाल्को यांचे समभाग मूल्य वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू सर्वाधिक १.५० टक्क्य़ांसह वाढला.