करोनाच्या देशव्यापी थैमानाने भीषण रूप धारण केले असतानाही, चांगल्या तिमाही निकालांच्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून झालेल्या खरेदीने भांडवली बाजारात सप्ताहारंभी सकारात्मक वातावरण होते. डॉलरच्या तुलनेत तब्बल २८ पैशांची रुपयाच्या मूल्यातील मजबुतीनेही बाजारात आशावाद जागवला.

प्रमुख खासगी तसेच सरकारी बँका तसेच रिलायन्ससह ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या दमदार खरेदीमुळे, सोमवारच्या व्यवहारात ‘सेन्सेक्स’ हा मुख्य निर्देशांक ५०८.०६ अंशांच्या कमाईसह ४८,३८६.५१ या पातळीवर उंचावला.

बरोबरीने निफ्टी निर्देशांकानेही १४३.६५ अंशांची भर घालत दिवसअखेर १४,४८५ हा स्तर कमावला. दोन्ही मुख्य निर्देशांकांमध्ये एका टक्क््यांहून अधिक वाढ दिसून आली.

सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या ३० समभागांमध्ये अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग सर्वाधिक ४.४० टक्क््यांनी वधारला, तर मार्च तिमाहीत चारपटीने वाढीच्या नफ्याची कामगिरी जाहीर करणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या समभागाने ३.६३ टक्क््यांची वाढ साधली. स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवरग्रिड, बजाज ऑटो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे खरेदीचे पाठबळ मिळालेले अन्य समभाग होते.

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये ०.८८ टक्क््यांची तुल्यबळ वाढ, बाजारात सोमवारी एकंदर खरेदीचे सकारात्मक वातावरण राहिल्याची प्रचीती देणारी होती. जागतिक स्तरावर प्रमुख भांडवली बाजारांमधील कल मात्र संमिश्र स्वरूपाचा होता. युरोपातील बहुतांश बाजारांची सुरुवात ही तेथील निर्देशांकांतील नुकसानीसह झालेली दिसून आली.