भविष्यातील बँकिंगच्या अपरिमित सेवा-परिघाचा वेध
नवतंत्रज्ञानाचा अवलंब व उपभोग वेगाने फोफावत असलेली भारत ही विशालतम बाजारपेठ आहे. सर्वच क्षेत्रे तंत्रज्ञानाने व्यापत चालली आहेत आणि बँकिंग सेवेत नवतंत्रज्ञानाच्या अवलंबाने या क्षेत्राला अपरिमित उंचीवर नेऊन ठेवले आहे.
बँकेतील आपली कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभराची सवड काढून जावे लागण्याचे दिवस केव्हाच मागे सरले आहेत. आज तीच कामे तंत्रज्ञानाच्या (इंटरनेट आणि मोबाइल फोन) साहाय्याने ग्राहकाला जेथे आहे तेथून व त्याच्या फुरसतीसह बोटांच्या टिचकीसरशी पूर्ण करता येतात. ही तर केवळ सुरुवात असून, तंत्रज्ञानातून साधल्या जाणाऱ्या बँकांच्या भविष्यातील ग्राहक-केंद्रिततेचा थांग आज लावता येणेही कठीण आहे.
आज आपल्याला २००० सालात काय घडले यापेक्षा २०३० सालात काय घडेल हेच अधिक जिव्हाळ्याचे आहे. काळाचा झपाटाच इतका प्रचंड आहे. कल्पना करून पाहा की, जर २००० साल उजाडत असताना तुम्हाला सांगितले गेले की, दिवसाचे २४ तास म्हणजे अहोरात्र आणि सप्ताहाचे सातही दिवस तुम्हाला बँकेतील उलाढाल अगदी मिनिटासरशी घरबसल्या करता येऊ शकेल.. त्या वेळी या गोष्टीवर कुणाला विश्वास ठेवता येणेच शक्य नव्हते; पण त्यानंतर अल्पावधीतच मोबाइल बँकिंग अवतरले आणि ती आज सामान्य बाबही बनून गेली आहे. मोबाइलद्वारे महिन्याला पावणेतीन कोटींहून अधिक होणाऱ्या बँकांतील व्यवहार हेच दर्शवितात; पण गंमत अशी की, २०३० उजाडेल तेव्हा आज वापरात असलेल्या या तंत्रज्ञानसमर्थ पद्धतीही निष्काम भासू लागतील आणि त्यांची जागा घेणाऱ्या नव्या पद्धती उत्क्रांत झालेल्या असतील. या क्षितिजावर दिसत असलेले असेच एक तंत्रज्ञान म्हणजे- ‘परिधानयोग्य बँकिंग’.
होय, पायी चालत जाऊन बँकेची शाखा गाठायची, काऊंटरपुढे रांगेत तिष्ठत उभे राहून कामे उरकायची, येथपासून खिशातील मोबाइलपर्यंत बँकिंग सेवेचे संक्रमण आपण अनुभवले आहे. अत्याधुनिक स्मार्ट वॉचेस आल्याने खिशातून मनगटापर्यंतचा प्रवासही लवकरच अनुभवास येईल. परिधानयोग्य बँकिंगचा हा ओनामा ठरेल. तुमची बँक ही तुमची सदासर्वकाळाची सांगाती बनेल. म्हणजे रस्त्यावरून चालताना, बँकेच्या शाखेजवळून गेलात, तर खात्यातील शिल्लक रकमेचा तपशील, तारीख नजीक आलेल्या देयकांचा भरणा करण्याचे तुम्हाला विनाविलंब स्मरण करून दिले जाईल; कुठल्याशा स्टोअरजवळून जात असाल तर तेथे ग्राहकांसाठी खुल्या ऑफर्स-सवलतींची माहिती तुम्हाला दिली जाईल. या सेवेचे इतक्या स्तरापर्यंत वैयक्तिकीकरण आणि प्रसंगोचित लवचीकता भविष्यात अजमावता येईल.
अर्थात स्मार्ट घडय़ाळे हेच परिधानयोग्य तंत्रज्ञानात्मकतेचे शेवटचे टोक नाहीच. स्मार्ट घडय़ाळांपल्याड, स्मार्ट आय-वेअर (स्मार्ट चष्मे), मुखमुद्रा आणि हावभावांतून नियंत्रित करता येणारी साधने आणि ज्याला इंटरनेट ऑफ िथग्ज म्हटले जाते अशा मोठी कनेक्टेड उपकरणे वगैरे उत्क्रांत होणारे रोमांचक जग हे सध्या कल्पनेच्या रूपात आपल्यापुढे आहे, तोच या ‘भविष्यसूचक बँकिंग’चा उद्गाताही ठरणार आहे. तुमची कार ते स्वयंपाकघरात तुम्ही वापरलेल्या भांडय़ांपर्यंत सर्व काही परस्परांशी जोडलेले आणि एम्बेड सेन्सर्सनी युक्त असतील, जी तुमच्या दैनंदिन जीवनातील सर्व घटना प्रसंगांच्या नोंदी घेत राहतील (अर्थातच तुमच्या परवानगीनेच!) आणि त्यांचे विश्लेषणही करीत राहतील.
कल्पनेचे तरंगही जेथे पोहोचू शकणार अशा अथांग शक्यतांच्या प्रांगणात आपली वाटचाल सुरू आहे. तुमच्यासाठी सखोल पातळीवर, तरी अनाहुतासारखी व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ न करता बँकेने काही विशेष योजना व उत्पादने तयार करून द्यावीत अशी तुम्हाला अपेक्षा करता येईल. तुमच्या दैनंदिन क्रियाकलापात बँका आणि वित्तीय संस्थांचा एक अदृश्य पदर तुमच्यासोबत कायम असेल. उदाहरणार्थ, तुमच्या फिटनेस बँडशी दुवा साधला जाऊन, निर्धारित फिटनेससंबंधी उद्दिष्ट गाठले गेल्या प्रोत्साहन म्हणून तुम्हाला एखादे बक्षीस दिले जाईल. तुमच्या तब्येतीचे विवरण (पल्स रेट, पुरेशी झोप व झोपेच्या नित्य सवयी, रोजचा व्यायाम, कॅलरीजचे सेवन) यांचा नित्याने माग घेऊन, तुमच्यासाठी सर्वात कमी खर्चाची व सानुकूलित विमा योजना तयार करून दिली जाईल. वेगवेगळ्या आरोग्यनिगा सेवा प्रदात्यांशी सामंजस्यातून, केवळ डॉक्टरांशी भेटीची वेळ ठरविणेच नव्हे, तर वैद्यक चाचण्या, सुयोग्य व सोयीस्कर व्यायामशाळेचे सदस्यत्व मिळवून देण्यासह त्यासंबंधाने सर्व आíथक उलाढालीही तुमची बायोमेट्रिक अधिप्रमाणन घेऊन बँकेकडून पूर्ण केले जाईल. कार्डचे पिन लक्षात ठेवायची गरज नसेल, तुमच्या हृदयाचे ठोके त्या जागी वापरात येतील. भविष्यात बँकिंगच्या बहुस्तरीय प्रमाणीकरणासाठी अशाच तुम्ही धारण केलेल्या वस्तू अथवा तुमचे शारीर घटक कामी येतील.
वर उल्लेखिलेले प्रवाह म्हणजे फक्त काही प्राथमिक शक्यता आहेत. ग्राहकांची प्रत्येक पसंत व नापसंत ही त्यांची व्यक्तिगत न राहता, अदृश्य स्वरूपात नोंदवून घेतली जाईल. या माहितीचा त्यांच्यासाठी कृतियोग्य आíथक नियोजनाचा आराखडय़ासाठी आवश्यक अंतज्र्ञान म्हणून वापर करण्यात ज्या बँका यशस्वी ठरतील त्यांना व्यावसायिक यश मिळेल. ज्यांना हे शक्य होणार नाही त्या लुप्त होतील. लेखक अॅक्सिस बँकेच्या रिटेल बँकिंग विभागाचे प्रमुख व समूह कार्यकारी आहेत.

पारंपरिक शाखांचे काय?
तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या कितीही भराऱ्या मारल्या तरी बँकेच्या शाखांचे महत्त्व कमी होणार नाही. बँकेच्या शाखांचे अस्तित्व राहीलच. ग्राहकांच्या लेखी प्राधान्यक्रम कमी होईल इतकेच. तंत्रज्ञानाने बँका आणि तिचे ग्राहक दोहोंसाठी नवनवी दालने खुली होत जातील, पण तरी आभासी आणि शारीर सेवा स्पर्शाचा संतुलित मिलाफ साधण्याची कसरत बँकांना करावीच लागेल. तुलनेने कमी संख्येने असतील, पण शाखांचे महत्त्व म्हणूनच अबाधित राहील. भविष्यातील बँकेच्या शाखांचे रूप हे अॅपल स्टोअरसारखे स्मार्ट, खुले आणि पारदर्शी असेल. काळाशी सुसंगत राहण्यासाठी असे परिवर्तन अपरिहार्यच ठरेल. केवळ उच्च मूल्याच्या व्यवहारांची पूर्तता, वित्तीय सल्ला, समुपदेशनाचा हेतूने ग्राहक शाखांपर्यंत चालत येतील.