मुंबई : शीतन उत्पादनांच्या क्षेत्रातील अग्रणी ब्लू स्टार लिमिटेडने वाणिज्य रेफ्रिजरेशन व्यवसायातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्याच्या योजनेसह तिची डीप फ्रीझर उत्पादनांची निर्मिती क्षमता दुप्पट केल्याची घोषणा केली. सुमारे १३० कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीतून महाराष्ट्रातील वाडा (पालघर) येथे स्थापित नवीन प्रकल्पातून उत्पादनास सुरुवात झाल्याने वार्षिक सुमारे दोन लाख डीप फ्रीझर आणि एक लाख स्टोरेज वॉटर कुलर तयार करण्याची क्षमता कंपनीने मिळविली आहे.

वेगवेगळय़ा वाणिज्य उपयोगाच्या डीप फ्रीझरच्या एकूण ३५-४० उत्पादनांचा ताफा ब्लू स्टारकडून विकसित करण्यात आला असून, त्या सर्वाची निर्मिती वाडा येथील प्रकल्पातून होत आहे, असे ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन यांनी बुधवारी आयोजित आभासी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्वसाधारणपणे हॉटेल, उपाहारगृहे, मॉल्स व डिपार्टमेंटल स्टोअर्ससाठी नाशवंत वस्तू आणि विशेषत: अन्न, मांस, मासे, आइस्क्रीम त्याचप्रमाणे रुग्णालये व उपचार केंद्रांमध्ये औषधे ठेवण्यासाठी या डीप फ्रीजरचा वापर येत्या काळात वाढत जाण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतात वाणिज्य रेफ्रिजरेशन उत्पादनांची बाजारपेठ ५,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारी असून, त्यात डीप फ्रीझरचा वाटा जवळपास ३५ टक्के आहे, तर ब्लू स्टारची या बाजारपेठेत सर्वाधिक २९ टक्के हिस्सेदारी आहे, असे कंपनीच्या कमर्शियल रेफ्रिजरेशन व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष एम. श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले. एकूण वाणिज्य प्रशीतन उत्पादनांच्या बाजारपेठेत ३४ टक्के हिस्सेदारीसह ब्लू स्टारचा वरचष्मा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.