मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. जागतिक महागाईची चिंता आणि परदेशी गुंतवणुकीच्या निर्गमनामुळे गुरुवारी बँकिंग, वित्त, आणि पायाभूत सुविधा कंपन्यांच्या समभागात जोरदार विक्रीचा मारा झाला.

अमेरिकेत महागाई दराने ३० वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. महागाई दर वार्षिक आधारावर ६.२ टक्क्यांवर पोहोचल्याने अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून आधीच्या अंदाजापेक्षा खूप लवकरच व्याजदरात वाढ केली जाणे अपेक्षित आहे.

यामुळे बाजारात घबराट पसरून,  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४३३.१३ अंशांच्या घसरणीसह दिवसअखेर ६० हजारांखाली, ५९,९१९.६९ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४३.६० अंशांची घसरण झाली. हा निर्देशांकही १८ हजारांची पातळी तोडत १७,८७३.६० पातळीवर स्थिरावला.