इस्रायलस्थित राफेल अ‍ॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्स या क्षेपणास्त्र निर्मितीतील जागतिक कंपनीशी अनिल अंबानी समूहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी रिलायन्स डिफेन्सने हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी संयुक्त भागीदारीचा सामंजस्याचा करार केला. या प्रकल्पात १० वर्षांत सुमारे १० अब्ज अमेरिकी डॉलर (साधारण ६५,००० कोटी रुपये) गुंतवणूक होईल. कोणाही भारतीय कंपनीने संरक्षण क्षेत्रातील निर्मात्याबरोबर केलेला हा सर्वात मोठा भागीदारी करार आहे. या भागीदारी प्रकल्पात, केंद्राच्या दिशानिर्देशांप्रमाणे रिलायन्स डिफेन्सचा ५१ टक्के तर राफेलचा ४९ टक्के वाटा असेल. मध्य प्रदेशातील पिठमपूर येथे हा प्रस्तावित प्रकल्प प्रारंभिक १,३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून स्थापला जाईल आणि त्यायोगे ३,००० हून कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, असे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.