रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्याकडूनही व्याजदर स्थिरतेची अपेक्षा करीत निवृत्त गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारही कमी महागाईलाच प्राधान्य देईल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्जे थकिताची समस्या लवकरच संपुष्टात येईल, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी कमी महागाईचे भारताचे धोरण यापुढेही कायम राहील, असे नमूद केले. नवे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी मंगळवारीच मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतला.

आपल्या पतधोरणाने भारताच्या महागाई दराला खाली ठेवण्यात यश मिळविले, असा दावा राजन यांनी केला. सरकारच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्षातील कमी महागाई दर हे या धोरणानेच शक्य झाले, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेसाठी जे आवश्यक होते, तेच आपण केल्याचे नमूद करत राजन यांनी या मुलाखतीत सरकार तसेच रिझव्‍‌र्ह बँकही कमी महागाईलाच प्राधान्य देईल, असा विश्वास व्यक्त केला.

कमी व्याजदर हे विकासाला प्रोत्साहन देतात, असे समर्थन त्यांनी अमेरिका तसेच युरोपातील मध्यवर्ती बँकांचा दाखला देत केले. जे देश व्याजदर वाढवतात त्यांची अर्थव्यवस्था संथ बनते, असेही त्यांनी या म्हटले आहे.

‘..तर व्याजदर कपात निश्चितच’

किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित ऑगस्टचा महागाई दर ५ टक्क्यांखाली आल्यास रिझव्‍‌र्ह बँक तिच्या नजीकच्या पतधोरणात पाव टक्क्यापर्यंत दर कपात करेल, असा विश्वास सिटीग्रुपच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक वित्तीय सेवा कंपनीच्या अंदाजानुसार, भाज्या तसेच डाळींच्या किमती कमी होणार असल्याने एकूण महागाई दर निश्चितच खाली येईल.