केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पीय भाषणात प्रवासी भाडेवाढ न करण्याच्या उल्लेखावर स्थिर व्यवहार करणाऱ्या भांडवली बाजाराने गुरुवारी प्रत्यक्ष रेल्वे अर्थसंकल्पातील माल वाहतूक दरांमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. याचा परिणाम सेन्सेक्समध्ये बुधवारच्या तुलनेत तब्बल अडीचशेहून e02अधिक अंशांची आपटी नोंदली जात मुंबई निर्देशांक २९ हजारापासून फारकत घेता झाला.
२६१.३४ अंश घसरणीने सेन्सेक्स २८,७४६.६५ पर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८३.४० अंश आपटीसह ८,७०० पासून दूर, ८,६८३.८५ वर जाऊन थांबला. प्रमुख निर्देशांकाच्या सत्रातील ही घसरण गेल्या पंधरवडय़ातील सर्वात मोठी ठरली. माल वाहतूक दरवाढीमुळे कोळसा, सिमेन्ट, स्टील, रासायनिक खते, इंधन क्षेत्रातील समभागांवर दबाव निर्माण होत त्यांचे मूल्य ७ टक्क्यांपर्यंत रोडावले.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दुपारी १२ च्या सुमारास रेल्वे अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात करण्यापूर्वी तसेच भाषण सुरू असताना बाजारात फार हालचाल नोंदली जात नव्हती. मात्र अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर जाहीर झालेल्या माल वाहतूक दरांमधील वाढीच्या आकडय़ाने बाजार पडझडीचे चित्र निर्माण झाले. २९ हजाराच्या वरच्या टप्प्यावर सुरुवात करणारा सेन्सेक्स फक्त २९,०६९.१३ पर्यंतच जाऊ शकला. तर त्याचा सत्रातील तळ ८,६९३.८२ राहिला.
सेन्सेक्समधील केवळ सहा समभाग तेजीच्या यादीत स्थिरावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती व तंत्रज्ञान निर्देशांक सर्वाधिक १.४३ टक्क्यांसह झेपावला. तर स्मॉल व मिड कॅप अनुक्रमे ०.८१ व ०.७९ टक्क्यांसह घसरले. बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवसाचे व्यवहार झाले. आर्थिक सर्वेक्षण शुक्रवारी संसदेत सादर होणार आहे. तर मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे शनिवारी सकाळी ११ वाजता मांडतील. या दिवशी भांडवली बाजारातील व्यवहार सुटी असूनही सुरू राहणार आहेत.